राज्यातील दृष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या माध्यमातून दृष्काळग्रस्तांसाठी निधीसंकलन करण्याचा निर्णय स्वागतयात्रेचे आयोजक कोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे घेण्यात आला आहे. यात्रेमध्ये विविध गोष्टींवर होणाऱ्या खर्चात कपात करुन शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.
ठाण्याच्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेला फार मोठे महत्व आहे. दरवर्षी मोठय़ा धुमधडाक्यात ही यात्रा काढण्यात येते. परंतू यंदा राज्यात पडलेला दुष्काळ लक्षात घेता यात्रेच्या माध्यमातून दुष्काळ ग्रस्तांसाठी निधीसंकलन केले जाणार आहे. यात्रेनिमित्त शहराच्या विविध भागांत लावण्यात येणारे झेंडे तसेच रांगोळी, पोस्टर, फटाके, बग्गी यांसारख्या विविध गोष्टींवर होणारा खर्च टाळून शिल्लक रक्कम दुष्काळग्रस्तांनी दिली जाणार आहे. तसेच यात्रेसाठी जमा होणाऱ्या निधीमधील काही रक्कम दृष्काळग्रस्तांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. याचप्रमाणे देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन स्त्रीसन्मान, स्त्रीसुरक्षा आणि स्त्री जागृतीचा संदेश यात्रेच्यामाध्यमातून दिला जाणार आहे. महिलांच्या स्वसंरक्षणाच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही यावेळी करण्याच येणार आहे. यासाठी महिला संस्था, महिला बचतगट, संघटना, भजनी मंडळे यांना मोठय़ासंख्येने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – डॉ.अश्विनी बापट – ९९६९०१७३६०, रविंद्र कराडकर – ९८९२१७७८८२