संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व जाणत स्वत: हातात झाडू घेऊन ग्राम स्वच्छतेचा मंत्र दिला. अशा या थोर समाजसेवकाचाो आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाबरोबरच देशाचा विकास साधावा, असे आवाहन येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बहुजन स्वराज महासंघाचे अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी केले.
गावाबरोबरच राज्य व देश जगात आदर्श करावयाचे असल्यास प्रत्येकाने गाडगेबाबांच्या आदर्शवादी स्वच्छतेचा वसा अंगीकारला पाहिजे. प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेचे महत्व व गाडगेबाबांचा संदेश रुजविला जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वानी स्वच्छतेविषयी प्रबोधन करावे, असे आवाहनही नाथेकर यांनी केले. मेन रोडवरील गाडगे महाराज पुतळ्यास नाथेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी महासंघाचे शहराध्यक्ष किरण फुले, सुभाष चव्हाण, धर्मराज कवठेकर, एम. बी. शेख आदी उपस्थित होते. यावेळी वाल्मिकी समाजाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश दलोड यांनीही मार्गदर्शन केले.