आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना सोबत करण्याची शपथ विवाहाच्या वेळी नवरा-बायको घेतात, पण त्यातील किती जण ती पाळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा. मात्र, नागपुरातील गायकवाड दाम्पत्याने ही शपथ पाळली. खासगी, सामाजिक एवढेच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही दोघांची सोबतीने वाटचाल सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०० व्या दीक्षांत सोहोळ्यात या दाम्पत्याला एकाच वेळी आचार्य (पीएच.डी.) पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. नवरा-बायकोला एकाच वेळी पदवी मिळण्याची ही कदाचित प्हिलीच वेळ असावी.
अकादमीत असल्याने पीएच.डी. करणे होतेच आणि त्या अनुषंगाने नोंदणीही केली. मात्र, प्राध्यापकी पेशात असलेल्या मोहन व अंजली गायकवाड यांनी ते ठरवून केले नाही. मोहन गायकवाडांनी पीएच.डी.साठी निवडलेला विषय आवडला नाही म्हणून मध्येच सोडून दिला. दरम्यान, प्राध्यापकी पेशातून बाजूला होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तातडीने तो अंमलातसुद्धा आणला. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. तोपर्यंत अंजली गायकवाड यांनी पीएच.डी.चे काम सुरू केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मोहन गायकवाडांना पीएच.डी. पूर्ण करण्याची उर्मी आली आणि विषय बदलून घेऊन त्यांनी नव्याने काम सुरू केले. इतर बाबी मागेपुढे झाल्या असल्या तरीही व्हायवाचा योग जुळून आला आणि दोघांनीही एकत्र व्हायवा दिला. अंजली गायकवाड या सी.पी.अँड बेरार महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. दरवर्षी त्या इंग्रजी शिकवणे आणि शिकणे या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद महाविद्यालयात आयोजित करतात.  गायकवाड-पाटील ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. मोहन गायकवाड यांनी ‘सम प्रॉब्लेम्स इन बायोमेट्रीक थेअरी ऑफ ग्रॅव्हीएशन अ‍ॅडमिटिंग वन पॅरामिटर ग्रुप ऑफ कन्फर्मल मोशन’ या विषयावर विद्यापीठाच्या पदव्युत्तर गणित विभागाचे प्रमुख डॉ. जी.एस. खडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले, तर प्रा. अंजली पाटील-गायकवाड यांनी ‘आऊटसायडर्स- पस्र्पेक्टीव्ह ऑफ द सोशिओ-इकॉनॉमिक मॅट्रिक्स ऑफ इंडिया: अ स्टडी ऑफ द वर्क्‍स ऑफ मार्क टूली अँड अदर्स’ या विषयावर संशोधन केले. श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सेवानिवृत्त डॉ. प्रकाश एओले यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन त्यांनी पूर्ण केले.