गणेशोत्सव २० दिवसांवर आला तरी पनवेत तालुक्यातील सार्वजनिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळू शकली नाही. विघ्नहर्त्यांचा उत्सवाला न्यायालयाच्या आदेशाची पोलीस ढाल करीत असल्याने  मंडळांनी चिंता व्यक्त केली आहे.  याबाबत पोलिसांशी समन्वय साधण्यासाठी व याप्रश्नी लवकरच तोडगा काढण्यासाठी पनवेलच्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या प्रतिनिधींनी विघ्नहर्ता गणेशोत्सव महासंघाची स्थापना केली आहे.
पनवेल तालुक्यामधील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी २२५ मंडळे आहेत. यापैकी सुमारे ७५ मंडळे रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करतात. पनवेलच्या शहरी भागांमध्ये जागेअभावी रस्त्यावरच मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. एका गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी या मंडळातील सदस्यांना पोलीस प्रशासन, सिडको, वाहतूक विभाग, वीज महावितरण आदी सरकारी यंत्रणेकडून परवानग्या घ्याव्या लागतात. यंदा पोलिसांनी महिनाभरापूर्वी मंडळांच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत कायद्याचे राज्य असल्याची घोषणा करीत न्यायालयाचा आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे रस्त्यावरील गणेशोत्सवांना स्थानिक पोलिसांकडून परवानगी मिळू शकली नाही.
गणेशोत्सवाचे दिवस हळहळू जवळ येत असल्याने आणि परवानगी मिळण्यासही विलंब होत असल्याने उत्सवाची तयारी कशी करायची, या चिंतेने ग्रासलेल्या  सिडको वसाहतीमधील सर्वच मंडळांनी   एकत्रित होऊन महासंघ स्थापन केला. या महासंघाचे नेतृत्व कांतिलाल कडू हे करीत असून यामध्ये सर्वेश दलाल, आत्माराम कदम, भीमराव पोवार, अशोक नाईक, संजय बहिरा, नारायणशेठ ठाकूर यांच्यासह २५ सदस्यांची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. हे सदस्य मंडळ पोलीस व इतर सरकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
सध्या पनवेल तालुक्याच्या परिसरामध्ये कळंबोली ६, खांदेश्वर १९, खारघर १८, कामोठे १४ आणि पनवेलमधील १५ मंडळे रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करतात. न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशात रस्त्याच्या एकतृतीयांश भागात सण साजरा करणाऱ्यांना मंडप टाकण्याची परवानगी द्यावी व उर्वरित रस्ता पादचाऱ्यांना चालण्यास खुला ठेवावा असे सांगितले असल्याने मंडळांची कोंडी झाली आहे.
सिडको व नगर परिषदेचे अधिकारी मंडळांच्या परवानगीचा अर्ज आल्यानंतर संबंधित मंडपाची नियमानुसार जागा ठरवून देणार आहेत. त्यामुळे वीस फूट रुंद रस्त्यावर पाच फूट जागा ही मंडपासाठी मिळणार आहे. या कमी जागेत उत्सव साजरा करणे अशक्य असल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.  नगर परिषद व सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर वाहतूक विभागाचे अधिकारी या परवानगीचा फेरविचार करणार आहेत. या दोनही विभागाकडून ना हरकत मिळाल्यानंतर पुढील परवानगीसाठी मंडळांचा अर्ज स्थानिक पोलिसांकडे पाठविण्यात येणार आहे. या कार्यवाहीत किती दिवस जातील याचा कोणतीच खात्री देता येत नसल्याने मंडळांनी चिंता व्यक्त केली आहे.