लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्या उद्देशाकडे दुर्लक्ष करून केवळ देखावे आणि सजावटीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. दरवर्षी यात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असली तरी यंदा महागाई व व्यावसायिक मंदीच्या संकटाने गणेश मंडळांची चिंता वाढली आहे. सर्व पैलूंचा विचार करता यावेळी विविध सार्वजानिक मंडळाचे बजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याचा अंदाज आहे.
गणेश मूर्तीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. पीओपी मूर्तीवर बंदीचा तूर्तास प्रस्ताव नसला तरी महापालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. पेट्रोल, डिझेल चढतीवर असल्याने जास्तीचा वाहतूक खर्चदेखील सहन करावा लागणार आहे. मूर्तीपुढे सजावट करणाऱ्या मंडळांना सजावटीच्या सर्वच वस्तू महागल्याने बजेटमध्ये कपात करावी लागण्याची चिन्हे आहेत. मोठी गणेश मंडळेदेखील यंदा खर्चात कपात करण्याच्या निर्णयाप्रत आली असल्याने यंदाचा गणेशोत्सव पूर्वीइतका झगमगाट राहणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. महागाईमुळे सामान्य कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे दारोदारी फिरून गोळा होणारी वर्गणीदेखील यावर्षी अपेक्षेप्रमाणे राहणार नसल्याचेच चित्र आहे. बडे वर्गणीदारही गतवर्षीच्या तुलनेत यंदा फारसा खर्च करण्याच्या स्थितीत नाहीत. पाऊस नसल्यामुळे व्यवसायात मंदी आल्याची उत्तरे देऊन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बोळवण केली जात आहे. याचा मोठा फटका डेकोरेशनचे काम करणाऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत.
मोठय़ा गणेश मंडळांचे सजावट आणि रोषणाईचे बजेटही मोठे असते. काही मंडळे चलदृश्ये बसवून मोठय़ा प्रमाणात गणेशभक्तांना आकर्षित करतात. परंतु, सजावट साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर पोहोचल्या असून कलाकाराचे मानधनदेखील दुप्पट वाढले आहे. देखावे करण्यासाठी स्थानिक कलावंताशिवाय कोलकाता आणि दिल्लीचे कलाकार देखावे उभारणीसाठी नागपुरात दाखल झाले असून त्यांच्या राहण्याची आणि निवासाची व्यवस्था संबंधित मंडळाला करावी लागत आहे. शिवाय त्यांचे मानधन वेगळेच. महाप्रसादाचे आयोजन करणारी मंडळे यावर्षी यात कपात करण्याची अधिक शक्यता आहे. प्रायोजक मिळविताना मंडळांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी देणग्या देणाऱ्यांनीही हात आखडता घेतल्याने मंडळांना कमी बजेटवर यंदा काम निभावून न्यावे लागले, असेच चित्र आहे. दरम्यान, काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फार भपकेबाज नाही, मात्र देखावे आणि सामाजिक कार्यक्रमांवर भर देऊन गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, याच दृष्टीने विचार केला जात असल्याचे सांगितले.