बाप्पाचे आगमन अवघ्या तीन दिवसांवरच आल्यामुळे तयारीला वेग आला आहे. चितार ओळीत गणपतीच्या मूर्तीचे जवळजवळ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अगदी छोटय़ा ४ ते ५ इंचाच्या मूर्तीपासून तर २५ फूट उंच मूर्ती चितारओळीत पाहायला मिळत आहेत.
काही मूर्तीकारांचे गणपती प्राथमिक अवस्थेत आहेत तर, काहींकडे पांढरी पुट्टी लावून त्यावर घिसाई करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक मूर्तीकाराकडे किमान ३० ते ४० मूर्ती तयार केल्या जात आहेत. एरवी ऑगस्टमध्ये पाऊस असल्यामुळे मूर्तीकारांकडील मूर्ती वाळत नसत, मात्र यावेळी विदर्भात कुठे फारसा पाऊस नसल्यामुळे मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला. मूर्तीवर व्हायटनिंग आणि रंगरंगोटीच्या कामालाही सुरुवात झाली आहे. बाहेरगावच्या सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींना प्रथम प्राधान्य देऊन त्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. महागाईचा फटका मूर्तीकारांना बसल्याने मोठय़ा मूर्तीच्या किमतीही २ ते ३ हजारांनी वाढल्या आहेत. चितारओळीतील राजू दारलिंगे, योगेश बालू, प्रमोद सूर्यवंशी, विजय इंगळे, मालोकर, माहुरकर, संजय बिंड, विजय वानखेडे, संजय सूर्यवंशी अशा मूर्तीकारांनी गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. चितारओळ शिवाय लालगंज, जागनाथ बुधवारी, जुनी शुक्रवारी, कुंभारपुरा या भागात गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. कारागीर मिळत नसल्याने घरातील महिला आणि मुले रंगरंगोटी आणि इतर कामांसाठी मदत करीत आहेत. अद्याप तरी खरेदीसाठी लोकांची गर्दी फारशी दिसून येत नाही. फक्त मूर्ती कशा तयार होतात हे बघण्याची उत्सुकता असलेल्या लोकांच्या झुंडी फिरताना दिसतात. उद्या बुधवारपासून खरेदीदारांची गर्दी वाढेल, असा विश्वास मूर्तीकारांनी व्यक्त केला.
नागपूर बाहेरील अनेक मूर्ती विक्रेत्यांनीही चितारओळीत मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठय़ा प्रमाणात विक्रीला आहेत. ज्येष्ठ मूर्तीकार प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, तणस, माती, पोते असे साहित्य जमवण्याचे काम आठ-दहा महिने आधीच सुरू होते. मूर्तीवर डिझाइन करण्याची माती वेगळी वापरली जाते. त्यानंतर मग हळूहळू कामाला सुरुवात होते. साध्या गाळीव मातीत भसोली ही माती मिसळून त्यात डिंक, कापूस टाकून पक्की माती तयार केली जाते. मोठय़ा मूर्तींसाठी तणस बांधून बेस दिला जातो, त्यानंतर त्याला माती लिंपून पोती गुंडाळली जातात. माती सुकल्यावरच त्याला व्हायटनिंग केले जाते. नंतर रंग दिला जातो. साधारणत: एक मूर्ती बनण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. या पूर्ण कामात श्रम आणि मेहनत खूप असल्याने आता नवीन मुले हे काम करायला येत नाहीत. इतका वेळ खर्च करण्याची मुलांची तयारी नाही त्यामुळे नवीन लोकांचा ओढा या कामाकडे अतिशय कमी आहे, असेही सूर्यवंशी पेंटर यांनी सांगितले. गणपतीबरोबरच गौरीचे मुखवटे तयार करण्याचे कामही सुरू आहे. मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंब यात दिवसरात्र गुंतलेले दिसते. कामेही विभागून दिली जात आहेत. एकंदरीत चितार ओळीत ‘गणपती फीवर’ जाणवत आहे.