नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांची ऐरोली सेक्टर १५ येथील इच्छापूर्ती गणपतीच्या मंदिरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामावर वक्रदृष्टी वळली असून सिमेटं क्राँक्रिटच्या सभामंडपाचे बांधकाम त्वरित हटविण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत. हे मंदिर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या कृपाशीर्वादाने उभारण्यात आले असून नाईक चौगुले सख्य सर्वपरिचित आहे. अनधिकृत असलेल्या या मंदिरासमोर सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबविण्याची नोटीस पालिकेने ठोकली आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा पश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईत धार्मिक स्थळांना विशेषत: मंदिरांना आपल्या छत्रछायेखाली ठेवले की आपली व्होट बँक निश्चित झाली असे एक समीकरण लोकप्रतिनिधींनी तयार केले आहे. त्यामुळे सिडकोने धार्मिक स्थळे उभारणीसाठी शेकडो अधिकृत भूखंड दिलेले असताना शहरात अनधिकृत मंदिरे उदंड जाहली आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील एक प्रकरणासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका अहवालानुसार शहरात एकूण ३६ अनधिकृत धार्मिक स्थळ असल्याचे म्हटले आहे. हा आकडा दिशाभूल करणारा असून न्यायदेवतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात ३६० अनधिकृत धार्मिक स्थळे असण्याची शक्यता आहे. रस्त्यातील वड किंवा पिंपळाच्या झाडाला पहिल्यांदा हळद कुंकू वाहायाचे त्यानंतर काही दिवसांनी या ठिकाणी घरातील देव्हाऱ्यात नको झालेले देव आणून ठेवायचे आणि नंतर त्या ठिकाणी काही दिवसांत सिमेटंचा चौथरा बांधून रातोरात मंदिर उभी करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींची कार्यप्रणाली झाली आहे. अशी मंदिरे शहरात जागोजागी दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. ऐरोली सेक्टर दोन व तीन येथील दोन नगरसेवकांनी तर जवळच्या राजीव गांधी मैदानाजवळील विद्युत उच्च दाबाखालील शेकडो एकर जमीन विविध संस्थांच्या मंदिर, मस्जिदींना एका दिवसात देऊन धार्मिक सलोखा साधण्याचा अनोखा प्रयत्न केलेला आहे. ‘जमीन कोणाची देतो कोण’ असा प्रकार असताना सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाच्या हे गावीदेखील नाही. त्यामुळे मंदिर, मस्जिदींच्या नावाने स्वत:चे चांगभलं करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे पेव सध्या शहरात फुटले आहे. अनधिकृत बांधकाम थोपविण्याची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासन ही धार्मिक स्थळे तयार होण्यास कारणीभूत आहे. मंगळवारी पालकमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांचा प्रवास या भागातील इच्छापूर्ती गणपतीच्या मंदिरासमोरून झाला. सिडकोची मोक्याची जागा बळकावून बांधण्यात आलेल्या या मंदिरात सभामंडपाचे प्रथम कच्चे (सिमेंटच्या छताचे) बांधकाम करण्यात आले होते ते आता पक्के करण्याचे काम सुरू होते. नाईक यांनी या बांधकामाला आक्षेप घेतला असून प्रशासनाला लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिकेने हे काम त्वरित थांबविण्याची नोटीस बजावली आहे. हे काम हेतूपरस्सर थांबविण्यात आल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे. या मंदिराची धुरा सांभाळण्यास सुरुवात केल्यापासून चौगुले यांच्या सर्व इच्छापूर्ण होत असल्याने त्यांची या गणपतीवर विशेष श्रद्धा आहे. (यापूर्वी त्यांची ‘गणेश’ नाईकांवर श्रद्धा होती) त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांच्या कृर्पाशीवादाने उभ्या असलेल्या अनधिकृत मंदिर, मस्जिदीवरील कारवाईची मागणी केली जात आहे. पालिका प्रशासनाची ही कारवाई करण्याची धमक आहे का असा सवाल केला जात असून त्यावेळी पालकमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. नाईक यांनी लोकसभा निवडणुकी अगोदर सादर केलेल्या बोलती बंद नावाच्या चित्रफितीत शहरात वाढलेल्या या अनधिकृत बांधकामांवर एक दृष्टिक्षेप टाकला होता.