नवी मुंबई पालिकेतील सत्तेचा सोपान कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा गणेश नाईक  पक्षाच्या परंपरागत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून उच्चविद्याविभूषित डॉक्टर, वकील, एमबीए उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे समजते. त्यामुळेच सहा एमबीए तरुणांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात नाईक यांचे दोन चिरंजीव आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांना अनुक्रमे ऐरोली व बेलापूर मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल शहरी भागात चांगले मत नसल्याचे लोकसभा विधानसभा निवडणुकीवरून दिसून आले आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी जनतेची धसकी घेतली आहे. त्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी राजकीय कारकीर्द टिकवण्यासाठी इतर पक्षात कोलांटउडी मारण्यातच धन्यता मानली आहे. नवी मुंबईत पालिका निवडणुका एप्रिलच्या चौथ्या आठवडय़ात होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या दोन पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढल्यास काही खरे नाही अशीच भावना इच्छुक उमेदवारांची झाली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप हे दोन पक्ष पक्षांतर करणाऱ्यापुढे पर्याय म्हणून आहेत. मात्र मागील काही दिवसापासून अच्छे दिनाचा बुडबुडा फूटू लागल्याने बुरे दिनाची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला आशेचे किरण दिसू लागले असून अनेक वर्षे पालिकेत आपली मक्तेदारी कायम ठेवणाऱ्या नगरसेवकांना बाजूला सारून वेगळा प्रयोग करण्याचा राष्ट्रवादीचे नेते विचार करीत आहेत.
नाईक यांचे नवी मुंबईवर चांगले प्राबल्य असून २० वर्षे पालिकेवर त्यांनी एक हाती सत्ता टिकवली आहे. या काळात शेजारच्या इतर पालिकांपेक्षा नवी मुंबई पालिका कांकणभर सरस ठरली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला असला तरी नाईक यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आजही कायम आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार बदलण्याची गरज होती अशी यामागची भावना अनेकांनी बोलून दाखविली असून नाईकांनी आपल्या पराभवाचे जाहीर कारण गाफीलपणाला दिले आहे. त्यामुळे पक्षापेक्षा नाईक यांच्या इतकी वर्षे संपर्कात असणाऱ्या तरुणांना यावेळी निवडणूक मैदानात उतरविले जाणार असून सहा एमबीए, दोन डॉक्टर, एक वकील या तरुणांना तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रभाग रचना व आरक्षणामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांचे पत्ते कापले गेले आहेत. नगरसेवकपदाची चटक लागलेले हे पालिकेचे जावई शेजारच्या प्रभागांच्या शोधत आहेत. त्यांना बाजूला सारून सुशिक्षित, पारदर्शक आणि तरुण उमेदवार देण्यावर कल राहणार आहे. नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलात (एनआरआय) अशा तरुणाचा शोध पूर्ण झाला असून त्याला कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तर ऐरोलीत सेक्टर ५ व ६ मध्ये एका अत्यंत साध्या, सरळ आणि राजकारणापासून चार हात लांब राहिलेल्या रहिवाशाला निवडणुकीच्या बोहल्यावर चढविले जाणार आहे. पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून सोबत केलेल्या काही आजी-माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाणार आहे, पण यावेळी सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, असे येथे सांगितले जात आहे.