चार महिन्यांवर आलेल्या पालिकेची सत्ता स्थापन करण्यासाठी काय पण करा दादा, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी माजी मंत्री गणेश नाईक यांना घातले आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत असा मोलाचा सल्ला न देणारे नगरसेवक स्वत:ची वेळ आल्यावर नाईकांना पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा सल्ला देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकसभा विधानसभा हातातून गेलेल्या नाईकांसमोर यावेळी पालिका राखण्याचे मोठे आव्हान असून काय करावे या संभ्रमात नाईक कुटुंबीय आहे. त्यात चार नाईकांपैकी दोन नाईकांच्या हातात भाजपचे कमळ देण्याची खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांची नवी मुंबईतील एक हाती सत्ता अलीकडे निसटू लागली असल्याचे चित्र आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे सपाटून मार खाल्यानंतर आता निदान पालिका टिकून राहावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक रथी-महारथी उमेदवारांनी भाजपची कास पकडली आणि काही जणांनी हातातून जाणारी आमदारकी टिकवून ठेवली. यावेळी नाईक यांना ठाण्याची ठाणेदारी देण्याची तयारी भाजपच्या नागपूरमधील एका बडय़ा नेत्याने दाखविली होती. त्यावेळी नाईकांच्या काही हितचिंतकांची एक बैठकदेखील व्हाइट हाऊसवर झाली होती. तेव्हा भाजपची ऑफर स्वीकारण्याचा सल्ला या खास सल्लागारांनी दिला होता.मात्र, सत्तेसाठी कोलांटय़ा उडय़ा घेतल्याने भावी पिढी दोष देईल असे वागणार नाही असे सांगून नाईक यांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते.
नाईकांच्या या नकारामुळे बेलापूरच्या मंदा म्हात्रे केवळ नाईकांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी निवडणूक मैदानात उतरलेल्या असताना चक्क आमदार झाल्या. त्यांनी नाईकांचा निसटता पराभव केला. या दोन निवडणुकीमुळे शहरात अजूनही भाजपचे वारे जोरात असून पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पालापाचोळा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाकरी फिरवण्याचा सल्ला नगरसेवकांनी दिला आहे. यात नाईकांचा पालिकेतील सत्ता सोपान कायम राहावा या इच्छेबरोबरच स्वत:ची नौका किनाऱ्यावर लावण्याचा नगरसेवकांचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. नाईकांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय न घेतल्यास पक्षाच्या ५० नगरसेवकांपैकी अर्धे नगरसेवक भाजप-शिवसेनेच्या दावणीला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुरुवारी नगरसेवकांनी नाईकांना शेवटची संधी दिली आहे. पक्ष सोडणार असाल तर तुमच्याबरोबर अन्यथा तुम्हाला सोडून जाणार असा अप्रत्यक्ष इशारा या नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे नाईक काय निर्णय घेतात त्याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. नाईकांच्या घरातील चार नाईक नवी मुंबईचे पाईक आहेत. त्यातील दोन म्हणजे माजी खासदार संजीव नाईक व महापौर सागर नाईक हे भाजपमध्ये पाठविण्याची खेळी खेळली जाऊ शकते. स्वत:साठी भाजपमध्ये न जाणारे नाईक व आमदार संदीप नाईक हे राष्ट्रावादीचे घडय़ाळ मनगटावर कायम ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात उदयास न आलेली भाजप राष्ट्रवादी युती निदान शहरात तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.