दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आयत्या वेळी रेल्वेचे आरक्षण न मिळाल्याने खासगी गाडय़ांमध्ये अव्वाच्या सव्वा भाडे भरून वाहतूक कोंडीत अडकत गाव गाठावे लागते. मात्र यंदा रेल्वेने गणेशभक्तांचे साकडे एकून ही समस्या दूर केली आहे. याआधीच मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त १४४ पेक्षा जास्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात भर म्हणून आता कोकण रेल्वेनेही एका विशेष गाडीच्या १८ फेऱ्या कोकणासाठी चालवण्याचे नियोजन केले आहे. आरक्षण २३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
००११६ रत्नागिरी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी २८, ३०, ३१ ऑगस्ट आणि १, ३, ४, ६, ७, ८ सप्टेंबर रोजी रत्नागिरीहून सकाळी ५.१५ वाजता सुटेल आणि मुंबईला दुपारी १.१० च्या सुमारास पोहोचेल.  याच दिवशी ००११५ लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी ही गाडी दुपारी १.४५ वाजता सुटणार असून ती रत्नागिरीला रात्री ९.५० वाजता पोहोचेल.
ही गाडी संगमेश्वर, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल. या गाडीत द्वितीय श्रेणीचे आरक्षित १० डबे आणि अनारक्षित दोन डबे असतील. या गाडीच्या आरक्षणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.