‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड मॅनेजमेंट’ या संस्थेच्या कलिना संकुलातील दोन्ही इमारतींची निकृष्ट बांधकाम आणि देखभालीअभावी झालेली दुरवस्था दूर करण्याकरिता आता या संस्थेच्या उभारणीत महत्त्वाचा हातभार असलेल्या प्रसिद्ध गरवारे उद्योगसमूहानेच पुढाकार घेतला आहे.
गरवारे संस्थेच्या दूरवस्थेवर ‘लोकसत्ता’च्या १ जुलैच्या ‘मुंबई वृत्तान्त’मध्ये छापून आलेल्या वृत्ताची दखल घेत गरवारे उद्योग समूहाचे संचालक ए.एम. देशपांडे यांनी तातडीने आपल्या अधिकारी व तंत्रज्ञांसह कालिना येथे धाव घेऊन पाहणी केली. संस्थेची दूरवस्था पाहून त्यांनी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञ, आस्थापना अधिकारी आदींची बैठक घेऊन संस्थेच्या इमारतीची अवस्था सुधारण्याकरिता काय करता येईल याची चर्चा केली.
या संस्थेच्या उभारणीत गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक आबासाहेब गरवारे यांचा मोठा हातभार आहे. आबासाहेबांनी १९८०मध्ये विद्यापीठाला दिलेल्या आर्थिक निधीतून संस्थेची जुनी इमारत बांधण्यात आली. विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान आदी पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालविले जावेत, या हेतूने ही संस्था उभारण्यात आली होती. त्या करिता गरवारे फाऊंडेशन वेळोवेळी आर्थिक मदतही करीत आले आहे. एवढा मोठा उद्योगसमूह संस्थेच्या पाठी असतानाही तिची अशी दुरवस्था झाली होती.
कलिनामध्ये गरवारेच्या दोन इमारती आहेत. पण, दोन्ही इमारतींची देखभाली व दुरुस्तीअभावी दुर्दशा झाली आहे. जुन्या इमारतीच्या ग्रंथालयात पावसाळ्यात पाणी टपकत असते. ग्रंथालयाबाहेरील व्हरांडय़ातही मुसळधार पावसामुळे पाण्याचे तळे साचलेले असते. व्हरांडय़ांच्या बाहेर छताला भेगा गेल्याने ते कधीही कोसळू शकते, अशा अवस्थेला आले आहे.
नव्या इमारतीतील दोन जिन्यांच्या मधल्या भिंतींमधून पाणी गळत असते. काही ठिकाणी वाळवीने भिंती पोखरल्या आहे. तर गळतीमुळे नव्या इमारतीतील स्वच्छतागृह बंदच असते. या दोन्ही इमारतींच्या दूरवस्थेबाबत युवा सेनेचे कार्यकर्ते आणि अधिसभा सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनीही विद्यापीठाकडे पाठपुरावा चालविला होता.
खरेतर गरवारेकडे विद्यार्थ्यांकडून आलेले शुल्क आणि गरवारे फाऊंडेशनकडून मिळणारी आर्थिक मदत यामुळे निधीची कमतरता नाही. मात्र, संस्थेच्या तिजोरीच्या किल्ल्या विद्यापीठाकडे असल्याने आपलाच निधी वापरायला गरवारेला चोरी आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तानंतर मात्र विद्यापीठाने संस्थेच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. या शिवाय काही आर्थिक मदत लागल्यास आम्ही आमच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून करू, असे आश्वासन देशपांडे यांनीही संस्थेला दिले आहे. येत्या अडीच-तीन महिन्यात संस्थेच्या इमारतींची अवस्था नक्कीच सुधारेल. तसेच, या कामावर आपण व्यक्तिश: देखरेख ठेवू, असे देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  जिन्यावर जुन्या फायली, पेपर, गच्चीवरही मोडकळीला आलेले जुने फर्निचर हलविण्यात आले आहे. तसेच, ज्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग, प्लॅस्टरिंगची गरज आहे त्या त्या ठिकाणी ते केले जाणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

गरवारेची कोटीची मदत!
गरवारेची इमारत बांधण्यासाठी गरवारे समूहाने सुरुवातीला ३२ लाख रुपये दिले होते. तर त्यानंतरच्या ३५ वर्षांत वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी सुमारे १.३२ कोटी रुपये दिले आहेत. एवढे पैसे मिळूनही विद्यापीठ प्रशासनाने इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्षच केले आहे.