विवाह समारंभात अचानक वायू गळती झाल्याने आग लागून सिलिंडरचा स्फोट झाला. मानेवाडा मार्गावरील सिद्धेश्वर सभागृहात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पोहोचून आग विझविल्याने अप्रिय घटना टळली.
सिद्धेश्वर सभागृहात बुधवारी लग्न होते. करडे व बांडेबुचे कुटुंब, त्यांचे नातेवाईक व आप्तेष्टांची गर्दी होती. दुपारी बारा वाजताच्या सुमारास भोजन सुरू होते. त्यासाठी तळघरात स्वयंपाक सुरू होता. काही पदार्थ तळले जात होते. अचानक सिलिंडरचे रेग्युलेटर निघून त्यातून वायू गळती झाली. शेगडीतील ज्योतीमुळे लगेचच तेथे भडका उडाला. शेगडीवरच्या कढईतील तेल आणि वातावरणातील वायूमुळे आग लागली. त्यातच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज आणि आग यामुळे सभागृहातील आचारी, इतर कर्मचारी, वर व वधूपक्षांकडील मंडळी आदी सर्वाचीच धावाधाव झाली. जिवाच्या आकांताने सर्वच ओरडू लागल्याने आनंदी वातावरण अचानक गंभीर झाले. सर्वानीच सभागृहाबाहेर धूम ठोकली. परिसरातील लोकही धावले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सक्करदरा अग्निशमन केंद्राचे अधिकारी मोहन गुडधे यांच्या नेतृत्वाखालील अग्निशमन दलाचे जवान तीन गाडय़ांसह तातडीने तेथे पोहोचले. सभागृहातील तळघरात धुराचे साम्राज्य होते. तळघरात आणि बाहेरून पाण्याचा मारा करण्यात आला. आवश्यक तेथे फोमचा मारा करण्यात आला.
त्यातच काही जवान धाडसाने तळघरात शिरले. काही सिलिंडर त्यांनी बाहेर काढले. पेटलेला सिलेंडरही विझविला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या नियोजन, धाडस व कौशल्याने तासाभरात संपूर्ण आग विझविण्यात यश
आले.
दरम्यान, या सभागृहात सुयोग्य अग्निशमन व्यवस्था नसल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले असून याप्रकरणी सभागृह मालकावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सभागृहातील स्वयंपाकघरात केवळ दोन अग्निशमन उपकरणे असली तरी ती निकामी होती. अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र सभागृह मालकाजवळ होते.