राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्र. २१ मधील नगरसेवक विक्रांत मते यांनी वर्षभरात केलेली विकास कामे तसेच गोदावरी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली निर्माल्य संकलन बोट म्हणजेच पाण्यावरील घंटागाडी हे त्यांचे कार्य शहराबरोबरच राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीने भूषणावह आहे, असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष शरद कोशिरे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या वतीने शहरात संपर्क अभियानांतर्गत सातपूर विभागातील प्रभाग क्र. २१ मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोशिरे बोलत होते. उड्डाणपूल, सहापदरी रस्ता, विमानतळ, विविध बस स्थानकांचे सुशोभीकरण आदी योजना पक्षाचे मंत्री, खासदार व आमदार यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेल्या आहेत. माजी महापौर प्रकाश मते यांनी सुरू केलेली घंटागाडी व विक्रांत मते यांनी राबविलेली पाण्यावरील घंटागाडी अशा अनेक योजनांचाही प्रचार व प्रसार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची गरज कोशिरे यांनी व्यक्त केली. या वेळी दत्ता पाटील यांनी सिडको-सातपूर विधानसभा मतदारसंघातून पुढील आमदार राष्ट्रवादीचाच असावा, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागणे आवश्यक असल्याचे मत मांडले. नगरसेवक मते यांनी या प्रभागातील कामांची सविस्तर माहिती दिली. रोबोटसारखी महागडी यंत्रणा, अनाधिकृत फलकबाजी, घंटागाडीचे नियोजन, गटारमिश्रित पाणी नदीत न सोडता नवीन शुद्धीकरण योजना तयार करणे, पाणवेलींचा कायमस्वरूपी नायनाट होणे आदी विषयांवर आपण सातत्याने पालिकेच्या सभांमध्ये आवाज उठवीत आहोत, परंतु सभागृहाबाहेरही जनतेच्या प्रश्नावर आपण रस्त्यावर पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याचे सांगितले. सातपूर विभागात पक्षाचे सध्या फक्त दोन नगरसेवक आहेत. त्यांची संख्या १४ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही मते यांनी दिली. या बैठकीत मधुकर मौले, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब पाटील, अरुण काळे, संदीप हांडगे, तुषार ठाकरे, संगीता अहिरे आदी उपस्थित होते. आभार डी. डी. जाधव यांनी मानले.