पं. जवाहरलाल नेहरू पुनरूत्थान योजनेंतंर्गत महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेतील अनेक इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
मनपा प्रभाग क्रमांक १० मधील मजूरवाडी झोपडपट्टी येथील घरकुल योजनेतील सदनिका लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. संडास, स्नानगृह, छत यांना गळती लागल्याने येथील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाकडे दुर्लक्षपणा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
संडास, स्नानगृह गळत असल्याने त्वरीत दुरूस्त करावे, विद्युत साहित्य दर्जेदार स्वरुपाचे बसविणे (बऱ्याच ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही), सदनिकेच्या खिडक्यांच्या ग्रील व काचा खाली पडत असल्याने त्या त्वरित बदलण्यात याव्यात, इमारतीचे पाणी साठविण्याचा हौद-टाकी सार्वजनिक शौचालयालगत व गटारीलगत असल्याने भविष्यात पाणी दूषित होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करणे, पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करावी, टाकीच्या बाजूस लोखंडी कुंपण करावे, इमारतीच्या दोन्ही बाजूस प्रवेशव्दार करावे, सांडपाणी निचऱ्याची वाहिनी सुस्थितीत करावी, पाणी पुरवठा अखंडित व कमी दाबाने होत असल्याने जलवाहिनी दुरूस्त करावी, इमारतीस संरक्षक  भिंत बांधावी, इमारतीच्या आवारात बाकडे व खेळणीची व्यवस्था करावी, इमारतीच्या आवारात सार्वजनिक नळाची व्यवस्था करणे, आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.