24सुविधा जाऊ द्या मरणा लागूनी, असा अजब पवित्रा घोडबंदर रोड परिसराविषयी ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. येथील एकमेव स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली आहेच, पण अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेली लाकडे आणि इतर सुविधा मृताच्या नातेवाईकांना शेजारील स्मशानभूमीतून आणाव्या लागतात. याशिवाय मृत्यूच्या नोंदीसाठी पालिका कर्मचारी नसल्याने इतरत्र असलेल्या कार्यालयात नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
– पूर्व द्रूतगती महामार्गाच्या दुतर्फा थेट भाइंदर पाडय़ापर्यंत पसरलेल्या घोडबंदर रोडनामक नव्या ठाण्यात राहणाऱ्या रहिवाशांचे विविध समस्यांमुळे दररोजचे जगणे मुश्कील आहेच, पण त्याचबरोबर त्यांचे मरणही अतिशय महाग असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
– नव्या ठाण्याचे हे रूप वरकरणी लोभस आणि हवेहवेसे वाटत असले तरी प्रत्यक्षात येथे राहायला येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शहर वाहतुकीची अपुरी साधने, अनियमित पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी अशा प्रश्नांचा कायम लढा देत असलेल्या घोडबंदर परिसरात अंत्यविधीसाठी अवघी एकच स्मशानभूमी असून तिचीही अतिशय दुरवस्था आहे.
– चितळसर-मानपाडा परिसरात ही स्मशानभूमी असून तिथेही सुविधांची वानवा आहे. या स्मशानाजवळ अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या वखारीची सोय नाही. त्यामुळे नागरिकांना शहरातील अन्य स्मशानभूमीत जाऊन लाकडे आणावी लागतात. महापालिकेचे कर्मचारी व सुरक्षारक्षक उपलब्ध नसल्याने मृत्यूची नोंद करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय, अंत्यविधीसाठी शेगडीवर लाकडे रचण्याची प्रक्रिया नागरिकांनाच करावी लागते. (पूर्वार्ध)

– ’शुभारंभ, हॅप्पी व्हॅली, हिरानंदानी, हिलक्रिस्ट, डोंगरीपाडा, ब्रह्मांड, कोकणीपाडा, मनोरमानगर, आझादनगर, शिवाजीनगर, विद्यापीठ आदी परिसरांसाठी चितळसर-मानपाडा भागात एकच स्मशानभूमी
– ’या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठीच्या चार शेगडय़ा मोडकळीस.

– ’अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांची तसेच अन्य साहित्यांची वखारच नाही. वखारीच्या खोलीत भंगार.
– ’ठाणे शहरातील जवाहरबाग किंवा अन्य स्मशानभूमी परिसरातून लाकडे तसेच अन्य साहित्य नागरिकांना आणावे लागते.
– ’शौचालयाच्या छतावर पाण्याची टाकी बसवलेली असून ती भरलेली असेल तर नळाला पाणी येते. अन्यथा जमिनीवरील टाकीतील पाणी हात-पाय धुण्यासाठी घ्यावे लागते. मात्र, या टाकीमधील पाण्याला घाण वास येत आहे.
– ’स्मशानाच्या कानाकोपऱ्यात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या असून स्मशानाच्या एका खोलीत रिकामे ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या दिसून येतात.

– ’अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मृत्यूची नोंद ठेवण्यासाठी येथे महापालिकेचे कर्मचारीच उपलब्ध नाहीत. ’स्मशानभूमीच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आला असला तरी तोसुद्धा पूर्णवेळ नाही.
– ’सुरक्षारक्षक जागेवर नसेल तर अंत्यविधीची नोंद होत नाही. जेव्हा सुरक्षारक्षक येईल, तेव्हा त्याची नोंद होते. विशेष म्हणजे ही नोंद एक ते दोन दिवसांनंतरही होते.

सरणावर जळतात टायर
– घोडबंदर भागासाठी असलेल्या चितळसर-मानपाडा स्मशानभूमीत लाकडे मिळत नसल्याने काही नागरिक अंत्यविधीसाठी टायरचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. टायरच्या वापरामुळे परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत असून काही वेळेस घरातील भांडी धुराच्या काजळीने काळी होत आहेत. तसेच या स्मशानभूमीतील शेडचे नियोजन सपशेल चुकल्याने मान्सूनमध्ये अंत्यविधीच्या शेगडीवर पावसाचे पाणी पडते. परिणामी, आग विझते आणि मृतदेह अर्धवट जळतात. गेल्या वर्षी अशी घटना घडली होती. त्यानंतरच महापालिकेने सुरक्षारक्षक नेमला खरा, पण तोसुद्धा पूर्णवेळ उपलब्ध नसतो, अशी माहिती शिव प्रतिष्ठान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.