सध्या स्मार्ट म्हणविल्या जाणाऱ्या मोबाइल्सवरील अ‍ॅप्लिकेशन्सच्या तरुण पिढी इतकी आहारी जाऊ लागली आहे की त्यांना खऱ्या-खोटय़ाचाही विधिनिषेध राहिलेला नाही. प्लेंचेटच्या खुळासारखेच मोबाइलच्या माध्यमातून भूत शोधण्याच्या एका अ‍ॅप्लिकेशन्सच्या नादी तरुण लागले आहेत.
त्यातूनच अरे तो बघ.तो बघ..काळा दिसतोय..अरे यार निळा आणि लाल पण आलाय..असे संवाद सध्या कट्टय़ावर ऐकायला मिळत असून काळा, निळा आणि लाल म्हणजे भुताचे प्रकार आहेत. भुताची प्रतिमा पाहण्यासाठी तरुणांचे जथ्थे मोबाइलमध्ये तासन्तास डोळे लावून बसत असल्याचे चित्र दिसून येते. अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवर ‘घोस्ट अ‍ॅण्ड स्पिरिट्स’, ‘कॅमेरा घोस्ट’ आणि यासारखे इतर अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध असून त्याद्वारे भुताची प्रतिमा पाहता येते, असा तरुणाईचा (गैर) समज आहे. त्यामुळे भूत नेमके कसे असते आणि कसे दिसते, या उत्सुकतेपोटी तरुणाई मोबाइलवर या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे तासन्तास सर्च करताना दिसून येतात.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवर खेळ, मनोरंजन, पुस्तक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे तसेच नागरिकांना तात्काळ माहिती आणि मदत मिळावी, यासाठी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. याशिवाय दिवसेंदिवस नवनवीन अ‍ॅप्लिकेशन्सची भर पडू लागली असून त्याची तरुणाईवर भुरळ पडत आहे. काहीतरी नवीन शोधण्याच्या नादात तरुण मंडळी वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशन्सचा मोबाइलवर शोध घेऊ लागले आहेत. यातूनच तरुणांना ‘घोस्ट अ‍ॅण्ड स्पिरिट्स’, ‘कॅमेरा घोस्ट’ आणि यासारखे इतर अ‍ॅप्लीकेशन सापडले आहेत. या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे भूत पाहता येते, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे भूत पाहण्याकरिता तरुणांचे जथ्थे मोबाइलवर तासन्तास डोळे लावून बसत असल्याचे चित्र दिसून येते.
‘घोस्ट अ‍ॅण्ड स्पिरिटस्’, ‘कॅमेरा घोस्ट’ या दोन अ‍ॅप्लिकेशन्सचा सर्वात जास्त वापर होत असून हे दोन्ही अ‍ॅप्लिकेशन्स सुरू करताच एका वर्तुळामध्ये काळा, निळा आणि लाल अशा तीन रंगांचे ठिपके दिसतात. त्या ठिपक्यांची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल सुरू असते. मोठय़ा वर्तुळाच्या आत असलेल्या लहान वर्तुळातील एका त्रिकोणामध्ये हे ठिपके आले तर मोबाइलच्या कॅमेऱ्याद्वारे भुताची प्रतिमा दिसते, असा तरुणांचा दावा आहे. मात्र प्रत्यक्षात अ‍ॅप्लिकेशन्सच्या वापरादरम्यान भुताची कोणतीही प्रतिमा दिसून आली नाही. त्यामुळे केवळ ऐकीव गोष्टींच्या आधारे भूत पाहण्याकरिता तरुणांमध्ये उत्सुकता लागल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, भूत किती अंतरावर आहे, याचे मोजमाप करण्यासाठी रीडरची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे भुरळ घातलेल्या या अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे रात्रीच्या वेळी कट्टय़ावर जमलेल्या तरुणांचा भूत धुंडाळण्याचा खेळ रंगतो आहे.

रंग काय दर्शवतात..
काळा – कमी शक्तिशाली भूत.
निळा – शक्तिशाली भूत (भयानक.)
लाल – जास्त शक्तिशाली भूत (महाभयानक.)