मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थिनींकरिता असलेल्या वसतिगृहांच्या देखभाल व दुरुस्तीअभावी स्लॅब कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे येथील अस्वच्छतेचा सामना करण्याबरोबरच विद्यार्थिनी जीव मुठीत धरूनच वावरत असतात.
या ठिकाणी विद्यार्थिनींकरिता तीन वसतिगृहे आहेत. या सर्वच वसतिगृहांना केवळ रंगरंगोटीच नव्हे तर पूर्णपणे कायापालटाची गरज आहे. अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांच्या निलंबनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उठलेल्या जनक्षोभादरम्यान उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये वसतिगृहांच्या दुरवस्थेचाही प्रश्न अधोरेखित झाला होता. मात्र आपल्या कार्यालयाबाहेरील व्हरांडय़ात गारेगार हवा असणाऱ्या कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या या प्रश्नातली कळकळ समजली नसावी.
येथील सर्वच वसतिगृहांची निकृष्ट कामामुळे अक्षरश: वाट लागली आहे. भिंतींना ओल आल्याने बुरशीचे साम्राज्य, त्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याची भीती, छतातून पाण्याची गळती, निकृष्ट अन्न अशा कित्येक प्रश्नांचा सामना येथे राहणाऱ्या विद्यार्थिनींना करावा लागतो. त्यात रविवारी सायंकाळी येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहामधील पहिल्या मजल्यावरील न्हाणीघरातील स्लॅब कोसळल्याने विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी याच वसतिगृहातील उपाहारगृहातील पंखा कोसळला होता. त्यामुळे विद्यापीठाने उपाहारगृहाची व काही न्हाणीघरांची दुरुस्ती केली. मात्र त्यामुळेही विद्यार्थिनींच्या त्रासात काही फरक पडलेला नाही.
या वसतिगृहाच्या प्रत्येक मजल्यावरील न्हाणीघरात पाण्याची गळती होते. यामुळे न्हाणीघर कितीही वेळा साफ केले तरी घाणच राहते. पावसाळ्यात आंघोळ करून आल्यानंतर या पाण्याचा दरुगधीयुक्त अभिषेक झेलतच आपली रूम गाठावी लागते, अशी विद्यार्थिनींची तक्रार आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहांच्या दुरवस्थेवर ‘लोकसत्ता’ने २८ जून २०१४ च्या ‘मुंबई वृत्तान्त’मधील वृत्तातही प्रकाश टाकला होता. मात्र त्यानंतर केलेल्या किरकोळ कामांनंतरही वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रश्न दूर झालेले नाहीत. इमारतीच्या दुरवस्थेबरोबरच येथील अस्वच्छता हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. भिंतींना ओल आहे. शिवाय मुलींनी धुतलेले कपडे वाळत घालण्याकरिता योग्य सोय नाही. त्यामुळे येथील वातावरण सतत दमट असते. वसतिगृहांमध्ये किमान मुलींना आयआयटीप्रमाणे वॉशिंग मशीन देण्यात यावी, अशी सूचना आपण केली होती. त्यामुळे कपडे धुण्याचा व वाळविण्याचा थोडाफार त्रास कमी होईल. मात्र तिची अद्याप दखल घेतली नाही, अशी तक्रार अधिसभा सदस्य संजय वैराळ यांनी केली.
वसतिगृहांचे काही प्रश्न
’भिंतींना ओल येत असल्याने येथील वसतिगृहांमधील काही खोल्या रिकाम्या असतात. कारण त्यामुळे येणाऱ्या बुरशीमुळे संसर्गजन्य आजार होण्याची भीती असते.
’अन्नाचा दर्जा निकृष्ट
’ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक विद्यार्थिनी राहतात, त्या ठिकाणी दुसरीला पलंग आणि गादीची सोयही स्वत:च करावी लागते.
’क्रीडा वस्तू कपाटातच. तर काही ठिकाणी कॅरमबोर्ड दिला तरी बसण्यासाठी खुच्र्याची व्यवस्था नाही, त्यामुळे तो विनावापर पडून. टेबल टेनिसचा टेबल आहे, पण खेळायला जागा नाही. टीव्हीही नादुरुस्तच.
कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने संजय शेटय़े यांच्यासह अधिसभा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने मार्च-एप्रिल महिन्यात कलिनातील वसतिगृहांमध्ये पाहणी करून आपला अहवाल तयार केला आहे. मात्र या अहवालाचे पुढे काय झाले, ते काहीच समजलेले नाही.