राज्यात साडेचार महिन्यांनंतर होणाऱ्या औरंगाबाद व नवी मुंबई पालिकेच्या निवडणुका पारदर्शक आणि माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घ्याव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला असून नवी मुंबई पालिकेच्या १११ प्रभागांची रचना ही जीआयएस ( ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम) पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅनल पद्धतीमुळे १११ प्रभागांचे केवळ ५५ प्रभाग होणार आहेत. शनिवारी निवडणूक आयोगाच्या आयटी समितीने पालिका मुख्यालयाला भेट देऊन या पद्धतीची माहिती आयुक्त आबासाहेब जऱ्हाड आणि अन्य अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार आयुक्तांनी सोमवारी पालिका आधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली. नवी मुंबई पालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. त्याची तयारी पाालिका व राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाचे आतिरिक्त आयुक्त नितीन गद्रे यांच्या नेतृत्वाखाली आयटी समितीच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या उच्च आधिकाऱ्याबरोबर चर्चा केली. पालिकेने २०१० जनगणनेनुसार नवी मुंबई पालिकेच्या १११ प्रभागांची रचना करण्याचे काम सुरू केले होते. यावेळी पालिकेची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार आहे. त्यामुळे १११ प्रभागांचे ५५ पॅनल तयार होणार आहेत. एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना करण्याचे काम सुरू असतानाच निवडणूक आयोगाने या रचनेत मानवी हस्तक्षेप टाळता यावा यासाठी जीआयएस पद्धतीने ही रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका शहरातील एकूण लोकसंख्येनुसार प्रभाग गटांची हद्द निश्चित करून निवडणूक आयोगाला कळविणार आहे. त्यानुसार आयोग सॅटेलाइट इमेजेस प्रणालीनुसार ह्य़ा प्रभाग रचना ठरविणार असून गुगल मॅफद्वारे त्या सर्वाना पाहता येणार आहे. पॅनल पद्धतीमुळे एकूण ५५ प्रभाग पडणार असून एक प्रभाग हा १८ ते २० हजार मतदारांचा होणार आहे. त्याची रचना निवडणूक आयोग ठरविणार असल्याने विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग कशा प्रकारे असतील याची कल्पना त्यांना देखील राहाणार नाही. त्यामुळे नगरसेवक आणि इच्छुकांची धाकधूक वाढली असून प्रभागाची रचना मनासारखी व्हावी यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. प्रभाग रचना मनासारखी न झाल्यास अनेक नगरसेवक नांग्या टाकण्याची शक्यता आहे.
सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील निवडणूकाही त्याच पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला असून यावेळची प्रभाग रचना ही जीआयएस पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत अधिक पारदर्शकता येणार आहे. प्रभाग रचनेबरोबरच निवडणूक उमेदवारी अर्ज, छाननी, माघार या प्रक्रियादेखील ऑनलाइन घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे ही कार्यप्रणाली प्रत्यक्षात अमलात आणणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरणार आहे.
आबासाहेब जऱ्हाड,
आयुक्त, नवी मुंबई पालिका