ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी केलेल्या पार्टीला २२ मार्च रोजी ५० दिवस पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर, उपरोक्त दिवशी शहरातील निवडक ठेकेदार, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि बांधकाम विभागातील अभियंते यांच्या उपस्थितीत पुन्हा त्याच ठिकाणी पार्टी करण्याचा मानस व्यक्त करत सजग नागरीक मंचने नियोजीत पार्टीसाठी परवानगी देण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. ओझर विमानतळावरील पार्टीप्रकरणी चौकशी समितीने थातुरमातूर कारवाई केली. पार्टीस परवानगी देणाऱ्या अभियंत्यास निलंबित करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकून या सर्वाविरुध्द फौजदारी कारवाई करण्याची मागणी मंचने केली आहे.
सजग नागरीक मंचचे सचिव अ‍ॅड. सिध्दार्थ सोनी यांच्या नेतृत्वाखाली पार्टीसाठी परवानगी मागण्याचा अर्ज तसेच मागण्यांचे निवेदन बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी एखादा अधिकारी निवृत्त होतो म्हणून ठेकेदार मद्यपार्टीचे आयोजन करतो. त्यास बांधकाम विभागाने अधिकृत परवानगी दिली. या प्रकरणावरून ओरड झाल्यावर परवानगी देणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्यास चक्क विनंती बदली देण्यात आल्याचे मंचने निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करताना खातेनिहाय कागदपत्रे न बघता, अभियंत्यांची चौकशी न करता पोलिसी जबाबावरून कारवाईचा अहवाल तयार करण्यात आला.
वास्तविक, मुख्यमंत्री कार्यालयाचा बांधकाम विभागाशी संबंध नाही. सर्व कायदेशीर प्रशासकीय तरतुदींना फाटा देत चार कनिष्ठ अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले. ही कारवाई कायदेशीरदृष्टय़ा टिकणारी नसल्याकडे मंचने लक्ष वेधले.
या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याऐवजी त्यास विनंती देऊन वाचविण्याचा प्रयत्न कोणाच्या सांगण्यावरून झाला, पार्टीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकले नाही, कोणत्याही प्रक्रियेचे पालन न करता केवळ कनिष्ठ अभियंत्यांचे निलंबन कोणत्या तरतुदीच्या आधारे झाले, तारांकीत पार्टीस उपस्थित राहून सेवा-शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या, सरकारी पदाचा दुरुपयोग करून परवानगी देणाऱ्या, पार्टीत सहभागी झालेल्यांवर अद्याप का कारवाई झाली नाही असे प्रश्न मंचचे अ‍ॅड. सोनी यांनी उपस्थित केले.
अधिकारी व ठेकेदारांमध्ये रंगलेल्या पार्टीला २२ मार्च रोजी ५० दिवस पूर्ण होत आहेत. या पाश्र्वभूमीवर, ओझर विमानतळावर पार्टी आयोजित करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मंचने एका अर्जाद्वारे केली आहे.