सदनिका खरेदीसाठीचे नोंदणी शुल्क भरूनही सदनिकेचा ताबा देण्याऐवजी उलट बँक खात्यात पुरेसे पैसे नसतानाही नोंदणी शुल्काचा धनादेशच हाती थोपविणे ठाणे येथील बिल्डरला चांगलेच महागात पडले. ग्राहक न्यायालयाने या बिल्डरला त्याच्या या वर्तणुकीसाठी दोषी धरत नोंदणी शुल्काच्या दोन लाख रुपये रकमेएवढीच नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर दोन महिन्यांत ही रक्कम दिली गेली नाही तर एक लाख रुपयांचा दंडही आकारण्याचे न्यायालयाने या बिल्डरला बजावले आहे.
‘बेस्ट’ कर्मचारी तुषार जाधव यांनी सदनिका नोंदणीचे दोन लाख रुपये १५ सप्टेंबर २०१२ रोजी बिल्डर संजय गुरव यांच्या हवाली केले. त्यानंतर काहीच दिवसांनी सदनिका खरेदीबाबत करार करण्यासाठी जाधव हे उर्वरित रकमेसह गुरव यांच्याकडे पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर मात्र त्यांना धक्काच बसला. गुरव यांनी जाधव यांना आपण नोंदणी शुल्क परत करीत आहोत, असे सांगत धनादेश त्यांच्या हाती टिकवला. जाधव यांची फरपट इथेच थांबली नाही. गुरव यांनी दिलेला धनादेशही वटला नाही. त्यामुळे त्यांनी गुरव यांच्याकडे पुन्हा एकदा धाव घेत या प्रकाराची माहिती दिली. गुरव यांनी जाधव यांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष केले. अखेर जाधव यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेत गुरव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. जाधव यांची तक्रार ऐकल्यावर न्यायालयाने गुरव यांना नोटीस बजावत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. गुरव यांनी ग्राहक न्यायालयाच्या आदेशालाही प्रतिसाद दिला नाही. अखेर न्यायालयाने गुरव यांना त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीसाठी दोषी ठरवून नोंदणी शुल्काच्या रक्कमेएवढीच नुकसान भरपाई जाधव यांना देण्याचे आदेश देत दणका दिला.