काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असले तरी साडे तीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर भाव काहिसे खाली आल्याने जळगाव व नाशिक या प्रमुख शहरांसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठा ग्राहकांच्या प्रतिसादाने फुलून येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एरवी गुंतवणूक म्हणून हा मुहूर्त साधण्याकडे कल असला तरी यंदा त्याच्या जोडीला पुढील दोन महिने लग्नसराईचे असल्याने या दिवशी अलंकार खरेदीला देखील ग्राहकांकडून प्रतिसाद मिळण्याची आशा सुवर्ण व्यावसायिक बाळगून आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांकडून मजूरीत सूट, भेटवस्तू यासह अन्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सलग दीड ते दोन वर्षांपासून सोन्या-चांदीचे दर दररोज नवीन उंची गाठत असताना अक्षय्य तृतीयेवेळी तो कसा राहणार याविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. ३० हजार रुपये तोळा उंची गाठल्यानंतर गत काही महिन्यांपासून सोन्याचे भाव २७ हजाराच्या आसपास राहिला आहे. दराचा आढावा घेतल्यास २७ हजार रुपये तोळा या दराने ग्राहकांना सोनी खरेदी करता येईल. देशातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सराफ बाजारात या मुहूर्तावर नेहमी चांगला ‘ट्रेड’ पहावयास मिळतो. त्यातच, काही महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव ३० हजार प्रती तोळे तर चांदीचे ६५ हजार रूपये किलोपर्यंत चढलेले दर अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला अनुक्रमे २७ हजार आणि ३८ हजारापर्यंत खाली आले आहे. ही बाब ग्राहकांच्या खरेदीला प्रोत्साहन देणारी ठरू शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अक्षय्य तृतीया निमित्त सराफी व्यावसायिकांनी प्रत्येक तासाला लकी ड्रॉ काढून स्मार्ट फोन, मजुरीत ३० टक्के विशेष सूट, हिरे व नवरत्नाच्या अंगठीच्या मजुरीवर १०० टक्के सूट, गृहोपयोगी भेटवस्तू.. आदी नाविण्यपूर्ण योजना मांडल्या आहेत. जळगावची सुवर्णनगरी देशभरातील ग्राहकांना आकर्षित करते. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, लगतच्या गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांमधून ग्राहक सोने खरेदीला या बाजारपेठेला पहिली पसंदी देतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या बाजारातील लखलखाट काही और असते असा आजवरचा अनुभव. या वर्षी त्यात चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी जी खरेदी केली जाते, ती प्रामुख्याने गुंतवणूक म्हणून असते. त्यामुळे या मुहूर्तावर चोख सोने व चांदी खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी, बिस्किट अशा चोख वस्तुंचा समावेश असतो. यंदा सोने-चांदीच्या भावात काही अंशी घसरण झाल्याने ग्राहकांकडून अभुतपूर्व प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी व्यक्त केली. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणारे पारंपरिक गुंतवणूकदार असतात. ते सारे सोन्याचा भाव जेव्हा प्रती तोळे दोन हजार रूपये होता, तेव्हापासून अविरतपणे खरेदी करत आले आहे. यामुळे त्यांच्यासाठी सोन्याचे कमी-अधिक होणारे भाव हा गौण विषय आहे. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे, यंदा पारंपरिक ग्राहकांबरोबर लग्नसराईसाठी देखील हा मुहूर्त साधला जाणार आहे. आगामी सिंहस्थ पाहता वर्षभर लग्न मुहूर्त नसल्याने अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्याकडे अनेकांचा कल आहे. पुढील दोन महिने लग्नसराईचे असल्याने या दिवशी सोने खरेदीला त्या ग्राहकांचाही प्रतिसाद मिळणार असल्याचे ओढेकर यांनी नमूद केले. यामध्ये ९९.५० शुध्द सोन्याचे शिक्के, वेढणी व फॅन्सी अलंकार यासह पेशवाई व टेम्पल दागिन्यांची नवी मालिका ग्राहकांना खुली करून देण्यात आली आहे. तसेच चांदीच्या विविध अलंकार तसेच वस्तूंना ग्राहकांची विशेष मागणी आहे.