दरात चढ-उतारांची मालिका असली तरी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सोने-चांदी खरेदीला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुवर्णनगरी म्हणून परिचित असणाऱ्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने अवघा सराफी बाजार झळाळून गेल्याचे पहावयास मिळाले. यंदाचे वैशिष्टय़े म्हणजे, परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चोख सोने खरेदी करणाऱ्यांमध्ये गुंतवणूकदारांप्रमाणेच लग्नसराईसाठी हाच मुहूर्त साधत अलंकार खरेदी करणारे ग्राहकही होते. असा योग जुळून आल्याने बाजाराला सोनेरी किनार लाभली.
अक्षय्य तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तापैकी एक. या दिवशी खरेदी केलेली वस्तू अथवा सोने अक्षय्य म्हणजे कायम टिकते अशी भावना आहे. यामुळे ग्राहकांकडून अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत चोख स्वरूपात सोने-चांदे खरेदीला प्राधान्य दिले जाते. वर्षभरात या दिवशी सोन्या-चांदीची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात असल्याने त्याचे दर किमान या दिवशी तरी चढेच राहतात, असा काहिसा अनुभव असतो. या वर्षी मात्र त्यास छेद मिळाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कारण, सहा महिन्यांचा अभ्यास केला असता सोन्याचे भाव प्रती तोळा २५ ते २७ हजार रूपयांदरम्यान राहिले. तीन महिन्यापूर्वी सोन्याचा दर प्रती तोळा २५, ५०० रूपये होता. त्यानंतर तो २७ हजाराच्या आसपास राहिला. या दिवशी बहुतेकांचा कल मुहूर्त साधण्याकडे होता. संपूर्ण देशातील ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जळगावच्या सराफ बाजाराबरोबर नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार भागातील सराफी पेढय़ांत सोने-चांदी खरेदीत असणारा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम राहिल्याचे पहावयास मिळाले. जळगाव व नाशिक येथील आर. सी. बाफना, राजमल लखीचंद, भंडारी ज्वेलर्स, रिलायन्स ज्वेल्स, आडगावकर व टकले सराफ, जाखडी ज्वेलर्स, नाशिकरोडस्थित दंडे ज्वेलर्स अशा बडय़ा पेढय़ांमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून ‘हॉलमार्क’ असणारे चोख सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिल्याचे पहावयास मिळाले. त्यात विशेषत: तुकडा, नाणे, वेढणी व बिस्किटांचा समावेश होता. यंदा या उत्साहाला लग्नसराईचे निमित्त मिळाल्याने वधू-वरांसाठी दागिने खरेदी करण्यात आले. त्यात विशेषत बकुळी हार, राणी हार, कोलकत्ता डिझाईन, बांगडय़ा आणि सोनसाखळी, बंगाली कलाकुसरीच्या वस्तूसह पेशवाई अलंकारांना विशेष मागणी होती. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर जळगाव येथे सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्यामध्ये स्थानिकांबरोबर गुजरात, मध्यप्रदेश व अन्य राज्यातील ग्राहकांचा मोठय़ा प्रमाणात
समावेश होता. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी सराफ व्यावसायिकांनी येवल्याच्या अस्सल पैठणीपासून ते स्मार्ट फोनपर्यंतचे बक्षीस ठेवल्याने ग्राहकांची अवस्था ‘सोने पे सुहागा’ अशी झाली. सोडतीद्वारे टीव्ही संच अथवा फ्रिज, मजुरीत विशेष सूट, गृहोपयोगी भेटवस्तू अशा वेगवेगळ्या योजना मांडून सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दिवशी सर्वसामान्यांना किमान एक ग्रॅम का होईना सोन्याची खरेदी करता यावी म्हणून काही व्यावसायिकांनी हप्त्याने पैसे देण्याची व्यवस्था केली.

सर्वसामान्यांसाठी आंबा आंबटच
अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखण्याची सुरूवात करणाऱ्या ग्राहकांसमोर यंदा प्रतिकूल हवामानामुळे बोटावर मोजता येतील इतकेच पर्याय शिल्लक राहिल्याने आणि त्याचा परिणाम दरांवरही झाल्याने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजे मंगळवारी आंबे खरेदी करताना ग्राहकांना काहिसा हात आखडता घ्यावा लागला. एरवी ६०-७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या बदाम आणि लालबाग आंब्याने दराची शंभरी ओलांडली. हापूसचा भाव तर २०० रुपयांवर पोहोचला. यामुळे खरेदीचे प्रमाण काहिसे कमी झाले. अवकाळी पावसाने आंब्याच्या अनेक जाती अद्याप बाजारात दाखल होऊ न शकल्याने लालबाग व बदाम या आंब्याची चलती अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर राहिली. हापूस २२५ रुपये किलो, लालबाग १२० तर बदाम १०० रुपये किलो असा भाव होता. यंदा केवळ तीन प्रकारच्या आंब्यांमधून एक निवडण्याचा पर्याय ग्राहकांपुढे राहिला.

मुंबईपेक्षा नाशिकमध्ये दर अधिक
मुंबईहून सोने ने-आण करणे, त्यावर लागणारा व्हॅट किंवा स्थानिक कर यामुळे मुंबईच्या तुलनेत नाशिकमध्ये दर साधारणत १०० रुपयांनी अधिक आहेत. मात्र भाव २७ हजारावर स्थिर राहिल्याने ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे.
राजेंद्र ओढेकर (अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन)