तांबे, पितळीच्या भांडय़ासह सोने व चांदी चमकवून देतो, अशा भूलथापा मारत महिलांना गंडवणारी टोळी शहरात दाखल झाली आहे. शनिवारी त्यांनी आपल्या हातचलाखीचा नमुना  स्नेहनगरात राहणाऱ्या महिलेला दाखवून सांगून दीड लाखाने फसवणूक केली असून महिलांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
घरातील तांबे, पितळीचे भांडे या पावडर व लिक्वीडमुळे चमचम चमकतात, हवे तर प्रात्यक्षिक करून दाखवतो, अशा भूलथापाही हे भामटे मारतात. घरातील अडगळीत पडलेल्या वस्तूंना फुकट चकाकी करून देतात. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील दागिने चमकवून देण्यासाठी मागतात. याच प्रकारातून दोन भामटय़ांनी आर्णी रोडवरील राणा प्रताप गेट परिसरातील स्नेहनगरमध्ये राहणाऱ्या ललित रमेश जयस्वाल (४३) या महिलेचे घर गाठले. त्यांनी आपण लिक्वीडच्या सहाय्याने तांब्या, पितळीच्या भांडय़ासह सोन्याचे दागिने चमकवून देतो असे सांगितले. यावेळी महिलेने गळ्यातील गोफ, हातातील दोन बांगडय़ा, टॉप्स आदी १ लाख ४४ हजार रुपयाचे दागिने त्या भामटय़ाच्या हाती सोपवले. त्यांनी एका डब्यात दागिने हळद व लिक्वीड टाकून पाणी गरम करण्यास सांगितले. याच वेळी त्यांनी हातचलाखीने त्यामधून दागिने काढून डबा गरम करण्यासाठी सांगितले. त्यानंतर दहा मिनिटाने महिलेने डबा गरम करून बाहेर आणला असता ते भामटे तेथून पसार झाले होते. यावेळी महिलेने डबा पाहिला असता दागिने पळवल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वडगाव रोडचे ठाणेदार विपीन हसबनिस आणि पथकाने घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेतला. मात्र आरोपींचा थांगपत्ता लागला नाही.