बारावी व अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सुविद्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी’ व ‘लोकसत्ता’द्वारे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशवंत नाटय़गृहामध्ये नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुंबई विद्यापीठातील तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेश उकरांडे, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या ह्य़ूमन रिसोर्स विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुभाष साठे, करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर व सुविद्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. सुरेश उकरांडे यांनी अभियांत्रिकीच्या विविध शाखांतील करिअरबाबत त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. पदविका तसेच पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर विविध उद्योगांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन डॉ. उकरांडे यांनी केले. शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी उमेदवार जातात तेव्हा उद्योगांच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात, याबाबत सुभाष साठे यांनी माहिती दिली. जिथे नोकरीसाठी जाणार आहात त्या कंपनीची इत्यंभूत माहिती असायला हवी. ज्या शाखेमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्यातील मूलभत संकल्पनांचा तसेच रोजच्या जीवनातील वापराचा अभ्यास करावा. उदाहरणार्थ मेकॅनिकल अभियंत्याला सायकल कोणत्या तत्वावर चालते हे माहीत असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रीकल अभियंत्याला वीज निर्मिती नेमकी कशी होते हे माहिती असणे आवश्यक आहे. मुलाखतीतील कोणत्याही प्रश्नांचे उत्तर ‘माहीत नाही’ असे थेट सांगून मोकळे होऊ नये. मला या प्रश्नाचे उत्तर नेमके माहीत नाही पण तरी प्रयत्न करतो, असे म्हटल्यास आपला आशावाद व प्रयत्न करण्याची वृत्ती दिसते. विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेण्याच्या बरोबरीनेच नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक क्षमता विकसित करणेही महत्त्वाचे आहे, हे आनंद मापुस्कर यांनी सांगितले व त्यासाठी विविध तांत्रिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या दहावी, बारावी तसेच पदविका व पदवी अभ्यासक्रमांनंतर विविध तांत्रिक तसेच उद्योगांना आवश्यक अशा पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तेल व वायू क्षेत्रामधील विविध करिअरसंधींची माहिती वसंत मेस्त्री यांनी दिली. यामध्ये अभियांत्रिकी पदविका व पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबरीनेच बारावीच्या विद्यार्थ्यांनादेखील संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील मनुष्यबळ विकास करण्याचे काम गेली अनेक वर्ष सुविद्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी करत असून संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज तेल व वायू क्षेत्रामधील नामांकित कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुविद्या इन्स्टिटयूटच्या विविध अभ्यासक्रमांबाबतही माहिती दिली.