शारीरिक स्वास्थ्य राखणे आणि विरंगुळा या हेतूने दरवर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या ठाण्यातील अभिजनांनी आता उपवन तलाव स्वच्छता अभियान हाती घेतले असून गेल्या आठवडय़ात त्याची सुरुवात झाली. उपवन तलाव परिसर दरुगधी आणि कचरामुक्त होईपर्यंत ही गांधीगिरी कायम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
अतिशय व्यस्त दिनक्रम असणारे हे ठाणेकर गेल्या दोन वर्षांपासून हौस म्हणून मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी उपवन तलाव परिसरात दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी ते प्रशिक्षण आणि सरावासाठी येतात. सकाळी पावणेसहा ते सात वाजेपर्यंत त्यांचा सराव त्या परिसरात सुरू असतो.  मात्र तलावाकाठी असलेली घाण पाहून त्यांना वाईट वाटत होते. तलाव दूषित करणारी ही दरुगधी दूर करण्यासाठी आपणच काहीतरी करावे, या हेतूने त्यांनी स्वच्छ उपवन अभियान सुरू केले.
शहरातील या उच्चभ्रूंना प्रत्यक्ष जीवनात कधीही स्वत: साफसफाई करावी लागत नाही. कारण त्यापैकी काही डॉक्टर्स, इंजिनीयर्स, कंपन्यांचे सीईओ आणि व्यावसायिक आहेत. मात्र आपापले पद आणि प्रतिष्ठा बाजूला ठेवून स्वच्छ उपवन तलाव अभियानासाठी त्यांनी हाती झाडू घेतला आहे.
मॅरेथॉन प्रशिक्षणाच्या निमित्ताने गेली दोन वर्षे आम्ही एकमेकांना भेटत आहोत. त्यामुळे एक चांगला ग्रुप तयार झाला आहे. शहर स्वच्छतेसाठी आपणही काहीतरी करावे, हा विचार उपवन स्वच्छता अभियानामागे आहे. मात्र तो केवळ एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. या कामात सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्ही पन्नास जण आहोत. त्यापैकी काहीजण नियमितपणे स्वच्छतेची कामे करणार आहोत. तसे गट पाडण्यात आले आहेत.  मंगळवार, गुरुवारच्या तुलनेत आम्हाला शनिवारी जरा जास्त वेळ असतो. त्यामुळे त्या दिवशी मोठय़ा प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली जाईल, अशी माहिती एका अभिजनाने दिली.
‘कृपया या उपक्रमाविषयी लिहा, त्यातील व्यक्तींची नावे लिहू नका’, अशी विनंतीही त्यांनी केली. उपवन परिसरात फिरायला येणारे नागरिक सध्या कुठेही कचरा टाकतात. ते टाळण्यासाठी येथे कचराकुंडय़ा उपलब्ध करून देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.