मै सबका.. सब मेरे! उत्तर मुंबईतील ‘भारतीय जनता पक्षा’चे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचाराची ही ‘थीम लाइन’ हिंदूीत असली तरी मराठी मतदाराला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या राज ठाकरे यांच्या ‘महाराष्ट्र माझा..मी महाराष्ट्राचा’ या ओळीची आठवण करून देते. दहिसर, बोरिवली, कांदिवली आणि मालाड हा शेट्टी यांचा मतदारसंघ. खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटीन. मराठी भाषक सर्वाधिक असले तरी त्याखालोखाल गुजराती, हिंदी भाषकांबरोबरच बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन अशा अठरापगड प्रांत आणि जातीधर्मातीचे मतदार येथे आहेत. गेल्या वेळी मनसेमुळे मराठी मतांच्या विभागणीचा फायदा होऊन काँग्रेसचे संजय निरुपम निवडून आले होते. मनसेचा उमेदवार नसल्याने यावेळेस तो ‘फॅक्टर’ येथे नाही. शिवाय इथल्या गुजराती मतदारांवर ‘आपणो नरेंद्र भाई’चे गारूड आहेच.
२५ वर्षे राजकारणात असलेले आमदार शेट्टी हे तसे कसलेले गडी. त्यामुळे, बोलेरो गाडीवरील व्यासपीठसदृश रथावरून होणाऱ्या शेट्टी यांच्या प्रचारफेरीत ढोलताशे, फटाके आदी कर्णकर्कश गोष्टींना फाटा दिलेला आहे. त्यातून बोरिवलीच्या ज्या एमएचबी कॉलनीत त्यांची प्रचारफेरी निघणार होती ती वस्ती तशी खाऊनपिऊन सुखी असलेल्या, ‘आपण भले आपले घर भले’ अशा सुखवस्तू नोकरदारांची. त्यामुळे, हा असला गाजावाजा गडबड गोंधळ त्या शांत गल्ल्यांना रुचणार नाही याची जाणीवही शेट्टींना असते.
लिंक रोडवरील सायली रुग्णालयाजवळून सकाळी साडेआठच्या सुमारास प्रचारफेरीला सुरुवात होते. लिंक रोड, एमएचबी कॉलनीच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरू लागते. लोकमान्य टिळक, कल्पना चावला आदी मान्यवर व्यक्तींच्या नावाने उभारलेले चौक हे शेट्टींनी लोकांसाठी केलेल्या ‘कामा’च्या बायोडाटातील महत्त्वाचा भाग. चौकबाजीच्या जोडीला उद्यानबाजी हा शेट्टी यांचा आणखी ‘यूएसपी’. त्यामुळे, प्रचारफेरीत सुरू असणाऱ्या छोटेखानी भाषणांमध्ये बोरिवलीत आपण उभ्या केलेल्या चौकांची, उद्यानांची जंत्रीच ते सादर करतात. भाषण संपले की एक चॅनेलवाला त्यांना रथावरच गाठतो. भाषणाचा ‘बाइट’ होईपर्यंत कण्र्यावरील घोषणाबाजी बंद केली जाते. मुलाखत आटोपल्यानंतर प्रचारफेरीत पुन्हा चैतन्य संचारते.  
रणरणत्या उन्हातच एमएचबीच्या चिंचोळ्या गल्ल्या सर केल्यानंतर भाजपचा रथ ‘सोनी टॉवर्स’ सोसायटीच्या आवारात शिरतो. या भागातील मतदारांना कोणती भाषा रुचेल याचा अंदाज न आल्याने भाषणाला सुरुवात करण्याआधी शेट्टी खालच्या कार्यकर्त्यांला विचारून घेतात ‘हिंदी की मराठी’. कुणीतरी हिंदी म्हणतं, तर कुणी मराठी. मग, स्वत: शेट्टीच ‘मिक्स’चा तोडगा काढत आपले मागच्याच गल्लीत मराठीत सांगितलेले मुद्दे हिंदीत ऐकवतात. हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी अशा कोणत्याही भाषांमधून बोलण्यास शेट्टी यांना अडचण नसते.
लोकशाहीत तुम्ही मतदार हे राजे आहात, असे ‘रथा’तून आलेले शेट्टी पटवून देतात. काँग्रेसचे निरूपम पाच वर्षांपूर्वी निवडून आले ते अपघाताने याची आठवण करून द्यायलाही ते विसरत नाहीत. भाषण संपल्यावर हात उंचावून टॉवरमधील रहिवाशांना अभिवादन करतात. पण, टॉवरमधल्या एखाद दुसऱ्याच  खिडकीतून मतदार राजा डोकावत असतो. त्यामुळे, इमारतींवरून नजर फिरवल्यानंतर मनात भरून राहतात ते खिडक्यांसमोरचे काळे लोखंडी गजच.
‘सोनी टॉवर्स’नंतर प्रचाराचा रथ शेजारच्या ‘साई टॉवर्स’मध्ये शिरतो. तोपर्यंत काहींनी गल्लीच्या बाहेरचा रस्ता धरलेला असतो. त्यांना हाका मारून परत बोलावले जाते. काही परत फिरतात तर काही ऐकल्या न ऐकल्यासारखे करून पुढे चालत राहतात. अनेक तुपाळ चेहरे मरगळून गेलेले असतात. तर उन्हामुळे तापलेले काहीजण शेजारच्या दुकानाचा, मंदिराचा किंवा पर्णदार वृक्षाच्या सावलीचा आधार घेत रेंगाळत उभेच राहतात. घोषणाबाजी करून सोसायटीच्या आवारातून रथ बाहेर पडतो आणि हळूहळू  गल्लीच्या तोंडावर येतो. तोपर्यंत विखुरलेली कार्यकर्त्यांची फौज पुन्हा येऊन मिळालेली असते. टिळक चौकाजवळ येईपर्यंत ही फौज टिकून असते. चौकाजवळ सायंकाळच्या प्रचारफेरीच्या वेळेची आणि ठिकाणाची आठवण कार्यकर्त्यांना करून दिली जाते. कार्यकर्ते छोटय़ा टेम्पोत पक्षाचे झेंडे, टोप्या आदी प्रचाराचे सामान उतरवून ठेवतात आणि आपापल्या घरचा रस्ता धरतात.

निळ्याची नवलाई नावालाच
भाषण संपले की गोपाळ शेट्टी ‘जय महाराष्ट्र’बरोबरच ‘जय भीम’चीही घोषणा आवर्जून देतात. तेव्हा कुठे ‘यांची महायुती नाही का,’ याची आठवण मतदारांना होते. नाहीतर ही घोषणा आणि अधूमधून दिसणारा एखादाच निळा झेंडा घेतलेला कार्यकर्ता वगळला तर महायुतीतल्या ‘एटीएम’मधला ‘आठवले फॅक्टर’ कुठेच दिसत नाही.