दिवाळीपेक्षाही मोठा असलेला पोळयाचा सण आनंदात जावा यासाठी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. १५ ऑगस्टपर्यंत मदतनिधी पुरविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी दिले होते, परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे पूरपीडितांना मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तायडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शासनाने सर्वेक्षण पूर्ण केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप भाजप नेते विनोद तावडे यांनी येथे केला. नदीकाठच्या  मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश शासन यंत्रणेकडून देण्यात आले आहेत, मात्र सर्वेक्षण झाले नाही. केंद्र शासनाने अन्न सुरक्षा विधेयक तयार केले असून निवडणुका डोळयासमोर ठेवून मतपेटी  ताब्यात घेण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचाही आरोप तावडे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रीय भूसुधार मसुदा  शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा कट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. २००६ पासूनचे पूर पीडितांचे पसे शासनाकडे पडून असल्याने मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जुल महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीचे  सर्वेक्षण  पूर्ण झाले असून पोळयापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणापूर्वी सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिले होते आणि या आश्वासनाची पूर्ती केली आहे. आता शासनाने मदतीचा ओघ पाठविण्याची आपली जबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा शेतकरी  बाळगून आहेत. जिल्ह्य़ामध्ये अतिवृष्टीचे २९ जण बळी गेले आहेत. शासनाने तर्फे त्यांना ५० हजार ते एक लाख रुपये मदत देण्यात आली असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी मुख्यमंत्री निधीतून दीड लाख रुपये दिले जाणार आहेत. कोटय़वधीचे पीक नष्ट झाले आहे. यावेळी राजू संचेती, किरण पातूरकर, मदन येरावार, राजाभाऊ ठाकरे, दिवाकर पांडे, राजू डांगे, विजय कोटेचा व इतर भाजपचे कार्यकत्रे उपस्थित होते.