राज्यातील नियोजित दहा स्मार्ट सिटी अधिकाधिक नियोजनबद्ध व्हाव्यात यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रभावी आराखडा तयार करून या शहर उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. या संस्थेचा प्रदीर्घ अनुभव अशा स्मार्ट सिटी उभारण्यासाठी खूप उपयोगी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्या ३९ वर्षांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेने प्रसिद्ध केलेल्या गौरवग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. या वेळी चव्हाण यांचा सत्कारही करण्यात आला. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर होते तर विशेष अतिथी म्हणून ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. संस्थेचे महासंचालक डॉ. रामनाथ झा, नगरपरिषद महासंघाचे अध्यक्ष व खोपोली नगरपरिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय साने, राजकिशोर मोदी तसेच संचालिका डॉ. स्नेहा पळणीटकर, हंसाबेन पटेल तसेच गौरव समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव लटके आदी उपस्थित होते.
राज्यात शहरीकरण वाढत असून ते ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील साडेअकरा कोटी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले. वडोदराप्रमाणे राज्यात अग्निशमन अकादमीची स्थापना करून ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठीही संस्थेने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्तीचा विचार मनात न आणता अखंड कार्यरत राहा, असा मनोदय सभापती रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. अनेक अधिकारी या संस्थेने घडविले आहेत. तब्बल १९ वर्षे आपण महासंचालक होतो. माजी अध्यक्ष डॉ. जतीन मोदी यांनी केलेले मार्गदर्शन यामुळे आपण खूप काही शिकलो, अशी भावना चव्हाण यांनी मनोगतात व्यक्त केली. या वेळी माजी उपमहापौर अरुण देव, माजी सनदी अधिकारी अजितकुमार जैन, जयराज फाटक, माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर आदी उपस्थित होते.