कल्याण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून गोविंदवाडी रस्ता तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू आहे. या कामात एका तबेल्याचा अडथळा असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. तबेला मालक रस्त्यासाठी जागा देण्यास तयार नसल्याने या तबेल्याला वळसा देऊन पत्रीपूल ते दुर्गाडी बाह्य़ वळण रस्ता तयार करण्याचा आराखडा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून पालिका अधिकारी करीत आहेत. एका पालिका अभियंत्याने या वृत्ताला दुजोरा दिला.
गोविंदवाडी वळण रस्ता तयार करण्याची पूर्ण जबाबदारी ‘एमएसआरडीसी’ची आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे, अडथळे दूर करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. या रस्त्यावर एक तबेला आहे. तबेला मालक जागा सोडण्यास तयार नाही. त्याने हे प्रकरण न्यायालयात नेले आहे. न्यायालयाने तबेला मालकाच्या संमतीशिवाय रस्त्याचे काम करण्यात येऊ नये असे सूचित केले आहे. त्यामुळे पालिका आणि एमएसआरडीसीला तबेल्याच्या भागातून रस्ता तयार करताना अडथळा येत आहे. तबेला मालकाला पर्यायी जागा, बाजारभावाप्रमाणे रक्कम किंवा टीडीआर देण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत केला. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी यापूर्वी भाजप आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार यांनी आंदोलन केली आहेत. या रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनावरून ते काही दिवस आधारवाडी तुरुंगात होते. त्यामुळे हे दोन्ही भाजप आमदार प्राधान्याने हा रखडलेला रस्ता प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतील असा नागरिकांना विश्वास आहे.
पत्रीपूल ते दुर्गाडी पुलांदरम्यान दीड किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी एक तबेला आहे. हा तबेला हटविल्याशिवाय रस्ते काम पूर्ण होत नाही. तबेला मालक काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने या तबेल्याला ४०० मीटरचा वळण रस्ता तयार करून गोविंदवाडी रस्ता पूर्ण करण्याचा निर्णय ‘एमएसआरडीसी’ व पालिका अधिकाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यानच्या काळात तबेला मालकाचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार आहेत. सोळाशे मीटरचा गोविंदवाडी रस्ता दोन्ही बाजूने पूर्ण झाला आहे. तबेल्याच्या ठिकाणचा चारशे मीटरचा भाग अपूर्ण आहे.
या नव्या आराखडय़ामुळे हा रस्ता सागरी किनारा नियमन क्षेत्रात येतो. खाडी किनारी हा भाग आहे. त्यामुळे सीआरझेड, मेरिटाइम बोर्डाची परवानगी घेऊन ‘एमएसआरडीसी’ हा रस्ता पूर्ण करील असा विश्वास पालिकेच्या एका उच्चपदस्थ अभियंत्याने व्यक्त केला. राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आणि पालिका अभियंत्यांची निष्क्रियता गोविंदवाडी रस्ता रखडण्याला कारणीभूत असल्याचे पालिकेच्या एका सर्वसाधारण सभेत या विषयावरील चर्चेच्या वेळी उघड झाले होते. पालिकेला सक्षम आयुक्त लाभत नसल्याने हे किरकोळ विषय नाहक रेंगाळत असल्याची टीका नगरसेवक, नागरिकांकडून होत आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे स्वत:ची खुर्ची वाचवणे, प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या, अधिकाऱ्यांना पदभार देण्याचे आदेश काढण्यात व्यस्त असल्याने महत्त्वाचे प्रकल्प, रखडलेली कामे मार्गी लावण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांकडून खासगीत केली जात आहे.