उरण तालुक्यातील इंदिरा गांधी सरकारी ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासले गेले आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. येथे अत्याधुनिक असे सरकारी रुग्णालये उभारण्यासाठी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी मान्यता देण्यात आली परंतु प्रत्यक्षात यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई, पनवेल रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. ही ठिकाणे उरणपासून खूप दूर अंतरावर असल्याने प्रवासादरम्यान अनेक रुग्णांना अध्र्या अंतरावरच जीव गमवावा लागला आहे. यासाठी येथे अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उरणमधील एकमेव असलेले इंदिरा गांधी सरकारी रुग्णालय डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची कमतरता, आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसणे, रुग्णांच्या निवासाची व्यवस्था नसणे आदी समस्यांनी ग्रासले गेले आहे. वाढत्या महागाईमुळे सध्या वैद्यकीय उपचार सर्वसामान्य जनतेला परवडत नाहीत. त्यामुळे उरणच्या या सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उरण परिसरात जड वाहनांमुळे अनेक वेळा अपघात होत असतात. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय या रुग्णालयात नसल्याने रुग्णांना पाऊण तास-तास अंतरावर असलेल्या पनवेल, नवी मुंबईतील रुग्णालयात न्यावे लागते. अचानकपणे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली तर रुग्ण या कोंडीत अडकून वेळेवर उपचार न मिळाल्याने तो दगावतो. यावर उपाय म्हणून उरण तालुक्यात शंभर खाटांचे सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्याशी संपर्क साधला असता येत्या अर्थसंकल्पात रुग्णालयाच्या जागेच्या निधीची तरतूद करण्यात येणार असून उरण तालुक्यात लवकरच रुग्णालय उभारावे यासाठी आपण पाठपुरावा करीत असल्याचे मत भोईर यांनी व्यक्त केले आहे.

अत्याधुनिक सरकारी रुग्णालय बांधण्यासाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. या रुग्णालयात किमान शंभर खाटा, ११० कर्मचारी, १२ वैद्यकीय अधिकारी तसेच अत्याधुनिक उपकरणे असावीत, असे या प्रस्तावात म्हटले गेले होते. याकरिता शासनाला ५९०० स्क्वेअर मीटरची जागा देण्याचे सिडकोने मान्यही केले होते. त्यासाठी ८५ लाख रुपये सिडकोकडे जमा करावेत, असे ठरविण्यातही आले होते. मात्र या संदर्भात पुढे काहीच हालचाल झाली नाही. सिडकोच्या वतीने उलवा नोड, खांदेश्वरमध्ये रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
-डॉ. मोहन निनावे, जनसंपर्क अधिकारी, सिडको.