लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने ढवळून निघाले. जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी मतमोजणीनंतर जाहीर झाले. त्यात काही ग्रामपंचायतींवर प्रस्थापित गटाची सत्ता उलथवत विरोधकांनी वर्चस्व मिळविले तर काही ठिकाणी सत्ताधारी गटाने ग्रामपंचायत पुन्हा आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळविले. मालेगाव तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या एका जागेवर ‘नोटा’ पर्यायाने दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळवली.
जिल्ह्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पण त्यातील ३० ठिकाणी अविरोध निवड झाली असल्याने रविवारी ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने स्थानिक राजकारणाने चांगली उचल खाल्ली. या निवडणुकीसाठी ७२ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. चार ग्रामपंचायतींमध्ये रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. स्थानिक राजकारणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकींची मतमोजणी सोमवारी झाली. त्यात काही ठिकाणी धक्कादायक तर काही ठिकाणी अपेक्षेनुसार निकाल हाती आले. देवळा तालुक्यात निंबोळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिलीप पाटील यांच्या विकास पॅनलने १५ वर्षांपासून सरपंच असलेल्या पंकज निकम गटाची सत्ता उलथवून टाकली. विकास पॅनलने ११ जागांवर विजय संपादीत केला. इतर ग्रामपंचायतींमध्येही असे काही निकाल लागले. काही ठिकाणी सत्ताधारी गटाने सलग दुसऱ्यांदा तर काही ठिकाणी सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यात यश मिळविले. स्थानिक पातळीवरील ही निवडणूक राजकीय पक्षांच्या झेंडय़ाखाली कमी तर पॅनलच्या माध्यमातून लढविली जाते. यामुळे निवडणुकीत नेमकी कोणाची सरशी झाली याचे ठोकताळे बांधणेही अवघड ठरते. मतमोजणीच्या दिवशी सायंकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून निकाल संकलीत करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, कोणत्याही निवडणुकीत नकारात्मक मतदान अथवा ‘नोटा’ची सर्वाधिक संख्या असेल तर फेर मतदान घ्यावे या विषयीचा एक मतप्रवाह सध्या जोर धरत असतांनाच तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत एका जागेवर ‘नोटा’ची मतदार संख्या चक्क दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. एखाद्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या कोणत्याच उमेदवारास मतदान करण्याची इच्छा नसेल तर मतदारांसाठी ‘नोटा’ हा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. हा पर्याय उपलब्ध असला तरी ‘नोटा’ ला पडलेली मते ही विजयासाठी मात्र गृहित धरली जात नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ही मते एकप्रकारे अवैधच ठरत असतात.
अशावेळी ‘नोटा’ला पडलेली मते मतमोजणीत गृहित धरावीत आणि जर ‘नोटा’ पर्यायाला सर्वाधिक मते मिळाली तर त्याठिकाणी फेर मतदान घ्यावे असा एक युक्तीवाद हल्ली केला जात आहे. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जमात स्त्री राखीव जागेवरील जागेच्या मतमोजणीत ‘नोटा’ ला दुसऱ्या पसंतीची मते पडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या रविवारी झालेल्या निवडणकीची सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यात निमगाव ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांचा समावेश होता.
त्यातील प्रभाग तीन मधील अनुसूचित जमात स्त्री प्रवर्गासाठी राखीव असलेल्या एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात होते. त्यातील लिलाबाई बागुल यांना २४४ तर वत्सला अहिरे यांना १५४ मते पडली. त्याचवेळी ‘नोटा’ या पर्यायास चक्क २१८ मते पडली. म्हणजेच ‘नोटा’ला दुसऱ्या पसंतीची आणि विजयी उमेदवारापेक्षा फक्त २६ मते कमी पडली. असे असले तरी सध्याच्या निवडणूक नियमांनुसार मात्र बागुल यांनी अहिरे यांचा ९० मतांनी पराभव केला असाच निकाल जाहीर झाला आहे.