अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवा प्रयोग
शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर वाचनाचे संस्कार होण्यासाठी आणि त्यांच्या मनामनात मराठी साहित्य रुजविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात आता एक नवा प्रयोग केला जाणार आहे. पुढील वर्षी सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी ऐवजी ‘ग्रंथघोष’  होणार आहे. पुढील वर्षी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत सासवड येथे होणाऱ्या संमेलनाची सुरुवात ‘ग्रंथघोषा’ने होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी याविषयी ‘वृत्तान्त’ला अधिक माहिती देताना सांगितले की, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. या ग्रंथदिंडीत हजारो शालेय विद्यार्थी सहभागी होत असतात. दिंडीत विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असला तरी ग्रंथदिंडीत त्यांचा मराठी साहित्य, पुस्तके यांच्याशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे आजच्या पिढीतील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे संस्कार होण्यासाठी हा वेगळा प्रयोग करण्याचे आम्ही ठरविले आहे.
महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली असून हा ‘ग्रंथघोष’ कार्यक्रम नेमका कशा प्रकारे  करायचा त्याबाबत अंतिम तपशील अद्याप ठरलेला नाही. लवकरच होणाऱ्या बैठकीत तो निश्चित केला जाईल, असे सांगून डॉ. वैद्य म्हणाल्या की, ‘ग्रंथघोष’मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. संमेलन स्थळी नेहमीप्रमाणे पालखीत ठेवण्यात आलेल्या ग्रंथांचे पूजन होईल आणि त्यानंतर ‘ग्रंथघोष’ केला जाईल. या विद्यार्थ्यांकडून संत साहित्यातील अभंग, वचने, शाहिरी काव्य, मराठीतील काहीकविता, देशभक्तीपर गाणी, महाराष्ट्र गीते सादर केली जातील, असे सध्याचे नियोजन आहे.
‘ग्रंथघोष’मध्ये जे अभंग, कवने, कविता सादर केली जातील, त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे वाचन होईल. त्यांच्या शिक्षकांकडून ते याविषयी अधिक माहिती करून घेतील. यातून मराठी साहित्याची काही प्रमाणात का होईना विद्यार्थ्यांना ओळख होईल आणि यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने वाचनाचे संस्कार त्यांच्या मनावर होतील. ग्रंथिदडीच्या वेळेतच सकाळी ‘ग्रंथघोष’ हा कार्यक्रम होईल त्यानंतर नेहमीप्रमाणे संमेलन स्थळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असल्याचेही डॉ. वैद्य यांनी सांगितले.