संकेतस्थळावरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून सोडवा
महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना फर्मान
‘तणावमुक्त’ परीक्षा ही संकल्पना वांद्रयाच्या रिझवी महाविद्यालयाने फारच गांभीर्याने घेतली असून आपल्या ‘तृतीय वर्ष वाणिज्य पदवी’च्या (टीवायबीकॉम) विद्यार्थ्यांना थेट संकेतस्थळावरच पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी या ११ प्रश्नपत्रिका ‘डाऊनलोड’ करून घेऊन स्वत:च्या सोयीने कधीही सोडवाव्या आणि महाविद्यालयाकडे जमा कराव्या, असे फर्मान महाविद्यालयाने सोडले आहे. त्याशिवाय विद्यापीठ परीक्षेची हॉलतिकीटे विद्यार्थ्यांना दिली जाणार नाहीत, असे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे पूर्वपरीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयाकडे पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे, संकेतस्थळावरच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन परीक्षा ‘उरकण्याची’ अफलातून शक्कल या महाविद्यालयाने लढविली आहे. मात्र, यामुळे पूर्वपरीक्षांचे गांभीर्य संपून त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना वाटेनासे होईल, अशी महाविद्यालयातील प्राध्यापकांची तक्रार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांची रंगीत तालीम म्हणून पूर्वपरीक्षा (प्रिलिमनरी) महत्त्व असते. त्याचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ लेखी परीक्षा वर्गातच ज्याप्रमाणे विद्यापीठ घेते त्याप्रमाणे घेतल्या जाव्या, असा नियम आहे. या पद्धतीने संकेतस्थळावरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी त्या घरीच सोडवाव्यात हा प्रकारच आतापर्यंत कोणी केलेला नाही. महाविद्यालय कला (टीवायबीए) व विज्ञान (टीवायबीएससी) शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रितसर घेते आहे. पण, महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४००च्या वर आहे. इतक्या मुलांच्या परीक्षा घेण्यासाठी पुरेसे शिक्षक नसल्याने त्या या पद्धतीने ‘उरकल्या’ जात आहेत, अशी तक्रार एका शिक्षकाने केली.