अमरावतीपासून अवघ्या सात किलोमीटरवर मार्डी मार्गावरील संत अच्यूत महाराज हॉस्पिटलजवळ निसर्गरम्य वातावरणात जिज्ञासू वृत्तीला नवीन उभारी देणारे अनोखे विज्ञान केंद्र उभारण्यात आले असून येत्या रविवारी, २१ डिसेंबरला या ‘ग्रीन सर्कल’चे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां नलिनीताई लढके यांच्या हस्ते दुपारी ३.३० वाजता होत आहे.
‘ग्रीन सर्कल’च्या अष्टकोनी वास्तूत ज्ञानसाधनेसाठी संपूर्ण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशोधक विद्यार्थ्यांपासून ते कलाप्रेमींना त्यांच्यातील सृजनशीलता जोखता यावी, निगर्सप्रेमींना जंगलट्रेकचा आनंद घेता यावा, हा या विज्ञान केंद्राच्या उभारणीमागील उद्देश असल्याचे ग्रीन सर्कलचे संस्थापक डॉ. व्ही.टी. इंगोले यांनी सांगितले. या कला-विज्ञान केंद्रात अनेक प्रकल्प साकारलेले आहेत. त्यात सौरऊर्जा, पवनऊर्जा निर्मिती, जलशुद्धीकरण, मलशुद्धीकरण प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पॅराबोलिक सेपरेटर, सोलर वॉटर हिटरचा समावेश आहे. अवकाश संधोशन, वन्यजीवप्रेमी आणि कलेची साधना करणाऱ्यांनाही या ठिकाणी आपली साधना करता येणार आहे. येथे निवासाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण वास्तू ही सौरऊर्जाचलित आहे.
ग्रीन सर्कलच्या उभारणीत डॉ. व्ही.टी. इंगोले यांच्यासह त्यांचे बंधू डॉ. डी.टी. इंगोले आणि विद्याधर इंगोले यांचेही सहकार्य लाभले आहे. डॉ. व्ही.टी. इंगोले स्वत: संशोधक असून त्यांच्या नावे आतापर्यंत विविध संशोधनाचे २२ पेटंटस् आहेत. निसर्गाच्या सान्निध्यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळत असते, असे सत्तरीतले डॉ. व्ही.टी. इंगोले यांनी सांगितले. समाजालाही आपण काही देणे लागतो, या भावनेतून या कला-विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली असून या ठिकाणी एकांतात ज्ञानसाधना करण्यापासून ते विविध व्यक्तींशी संवाद साधून विचारांचे आदान-प्रदान करण्यापर्यंत सर्व सुविधा आहेत. एकाग्रतेतून अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी जन्माला येतात. या ठिकाणी संशोधकांना एकाग्रतेने काम करता येऊ शकेल, अशी माहिती डॉ. इंगोले यांनी दिली. कला व विज्ञानाची आवड असणाऱ्या तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत ग्रीन सर्कलमध्ये सर्वाना प्रवेश आहे. नावीन्यपूर्ण गोष्टींची निर्मिती करून ते समाजाला देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवणाऱ्यांसाठी या ठिकाणी सर्व साधने आहेत. ग्रीन सर्कलमध्ये प्रयोगशीलतेला वाव देण्यात आला असून संशोधन व अभ्यासासाठी १५ स्वतंत्र खोल्या. मध्यभागी सेमिनार हॉल, उंच घुमट, योगा हॉल, ग्रंथालय, खगोल दुर्बीण आदी संशोधनासाठी उपयोगी पडणारे सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.