परदेशी विद्यापीठांमधील प्रवेशाकरिता द्याव्या लागणाऱ्या ‘जीआरई’ या परीक्षेचा प्रचार आता रॉक संगीताच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तरुणाईला आकर्षित करण्याकरिता या परीक्षेच्या आयोजकांनी ही नामी शक्कल लढविली असून त्या करिता ‘मुंबई बँड’कडून रॉक संगीतावर आधारित एक गाणेच तयार करून घेण्यात आले आहे. तरुणाईचे कान ज्याला सतत जोडले गेलेले असतात त्या ‘एफएम’वर हे गाणे ऐकविले जाणार आहे.
ईटीएसतर्फे जीआरई घेतली जाते. तब्बल १८० देशांतील नऊ हजार ठिकाणी या परीक्षेचे आयोजन केले जाते. जीआरईबरोबरच ईटीएसतर्फे टोफेल आणि टोईक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षाही घेतल्या जातात.अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या परीक्षेची माहिती पोहोचविण्याकरिता ही कल्पना परीक्षेच्या आयोजकांनी लढविली आहे. माटुंग्याच्या पोद्दार महाविद्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पहिल्यांदाच हे गाणे ऐकविले गेले. परदेशातील नामांकित विद्यापीठांमधील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाकरिता जीआरई द्यावी लागते. या चाचणीत पात्र झाल्यानंतर पुढील पाच वर्षांत विद्यार्थ्यांना परदेशी संस्थांमध्ये प्रवेशाच्या संधी खुल्या राहतात. मुंबई बँड आणि ड्रीप ऑपेरीयन यांनी एकत्रितपणे हे गाणे तयार केले आहे.