विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी असे दोन गट पाहायची सवय झाली होती. परंतु या ठिकाणी पोलीस दलात असे कुठलेही गट नाहीत, हे पाहून हायसे वाटल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस मुख्यालयातील तळमजल्यावरच्या प्रशस्त सभागृहात एकत्र बसलेल्या अधीक्षक व त्यावरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाहून केले आणि पोलीस दलात असलेल्या गटबाजीबाबत अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.
आमच्या अडचणी आणि समस्यांची मुख्यमंत्र्यांनी माहिती करून घेतली. इतकेच नव्हे तर या अडचणी आणि समस्या कशा सोडवता येतील, याचीही विचारणा केली. पोलीस दलातील प्रत्येक अडचण सुटली पाहिजे, असाच मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. पोलिसांना अधिक अधिकार बहाल करण्याचे आपले प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलीस दल स्वायत्त असले पाहिजे, असाच मुख्यमंत्र्यांचा सूर होता. आतापर्यंत पहिल्यांदाच पोलिसांबद्दल इतका सखोल विचार केला गेल्याचे मतही काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले तर पोलीस दलाला इतकी सूट दिली तर हाहाकार माजेल, असे मतही यांपैकी काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी त्याचा गैरवापर होण्याची भीती यांपैकी काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस दलात गटबाजी नसावी, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असले तरी प्रयत्न गटबाजी आहे आणि विशिष्ट गटातील अधिकाऱ्यांनाच चांगली नियुक्ती मिळत असते.
बदल्यांचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असल्यास गटबाजीला आणखी ऊत येईल, असेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस दलावर सरकारचेच नियंत्रण असले पाहिजे. मात्र नियुक्त्या करताना कुठल्याही आयपीएस अधिकाऱ्यांचे मत विचारात न घेता केवळ कार्यक्षमता आणि ज्येष्ठता या जोरावर नियुक्त्या व्हाव्यात, अशी अपेक्षा या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.