विदर्भात यंदा ऑगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरी भूजल पातळी समाधानकारक असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) केलेल्या भूजल मूल्यांकनातून स्पष्ट झाले आहे. ‘जीएसडीए’ने १२१७ विहिरींचे निरीक्षण केले असून त्यांच्या पातळीतही समाधानकारक वाढ झाल्याचे नमूद केले आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ात ‘जीएसडीए’कडून दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात भूजल पातळीची तपासणी करण्यात येते. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात जूनमध्ये पाऊस न झाल्याने चिंता निर्माण झाल्याने जुलैमध्ये ‘जीएसडीए’च्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले.
जुलैमध्ये मिळालेल्या आकडेवारीची मे मधील आकडेवारीशी तुलना केली असता भूजल पातळी समाधानकारक दिसून आली. नागपूर जिल्ह्य़ातील भिवापूर, गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा, गोंदिया जिल्ह्य़ातील सालेकसा तालुक्यातील पातळी तीन मीटरने वाढल्याचे स्पष्ट झाले.
पूर्व विदर्भातील ६२१, तर पश्चिम विदर्भातील ५९६ विहिरींची भूजल पातळी तपासण्यात आली. ६३ पैकी ४३ तालुक्यांमधील भूजल पातळीत वाढ झाली आहे. यातील २४ तालुक्यांमध्ये एक मीटपर्यंत, १५ तालुक्यांमध्ये २ मीटपर्यंत, तर ४ तालुक्यांमध्ये ३ मीटपर्यंत भूजल पातळी वाढली आहे. तीन मीटरपेक्षा अधिक पातळी एकाही तालुक्यात वाढलेली नाही. नागपूर जिल्ह्य़ातील ९, वर्धा ८, भंडारा ७, चंद्रपूर २, गडचिरोली १० व गोंदिया जिल्ह्य़ातील ७ तालुक्यातील पातळीत वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पोंभूर्णा, नागभीड, कोरपना या तीन तालुक्यांतील पातळीत मात्र घट झाल्याचे आढळून आले आहे.
भूजल ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. विदर्भात भूजलाची उपलब्धता मर्यादित असतानाही शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणांसाठी भूजलाचा वारेमाप व बेसुमार वापर होत आहे. विशेषत: पश्चिम विदर्भात अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणविषयक बाबींचा फारसा विचार न करता भूजलाचा उपसा केला जात आहे. नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील सिंचन विहिरींच्या अतिउपशामुळे नद्यांची अधिक काळ वाहण्याची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. भूजलाच्या अतिउपशामुळे बाधित झालेल्या क्षेत्रात अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर, मोर्शी, वरूड, नागपूर जिल्ह्य़ातील काटोलचा समावेश आहे.

भूजल पातळीत घट नाही -शाह
‘जीएसडीए’कडून भूजल पातळी वर्षांतून चारदा मोजली जाते. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी चांगली वाढली. दरवर्षी मे महिन्यात भूजल पातळी तपासण्यात येते. यावर्षीच्या पाहणीत भूजल पातळीत घट झाल्याचे आढळले नाही. यंदाच्या पावसाळ्यात भूजल पातळी किती वाढली, हे ‘जीएसडीए’च्या पुढील पाहणी अहवालातून स्पष्ट होईल. आतापर्यंत केलेल्या विहिरींच्या निरीक्षणानुसार पाण्याची पातळी समाधानकारक आहे. भूजल पातळीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, असे ‘जीएसडीए’च्या नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ.आय.आय. शाह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.