जेएनपीटीतील जीटीआय या खाजगी बंदरातील कंत्राटी कामगारांना नोकरीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मंगळवारी कामावर आलेल्या कामगारांना कंत्राटदाराने प्रवेशद्वारातूनच बाहेर काढण्याचा प्रकार केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे कामगारांचे सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची शक्यता वाढली आहे. देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणी करणाऱ्या जीटीआय या बंदरातील कंटेनर हाताळणीचे काम १९४ कामगार कंत्राटी पद्धतीने करीत आहेत. आपल्याला जीटीआयने कायमस्वरूपी बंदराचे कामगार म्हणून समावून घ्यावे या मागणीसाठी कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलन जरी सुरू असले तरी कंटेनर हाताळणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. असे असताना जीटीआयमधील कंत्राटदार महेश इंटरप्राइजेसच्या सुपरवाझरने कामगारांना कामावर न घेण्याचा प्रकार मंगळवारी केला. जेएनपीटीचे अध्यक्ष निरज बन्सल यांनी कामगारांच्या मागणीसंदर्भात सोमवारी जीटीआय व आंदोलन कर्त्यांची बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केली होती. त्यानुसार जीटीआय व्यवस्थापनाला वेळ देण्याचा निर्णय घेत शुक्रवारी या संदर्भात पुढील बैठक घेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु असे असतानाही झालेला हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा आहे. कामगार काम करू इच्छीत असतानाही व्यवस्थापनानेच काम बंद केल्याने याची सर्व जबाबदारी व्यवस्थापनाचीच राहील असे जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी व्यक्त केले. या संदर्भात कामगारांना पािठबा देणाऱ्या सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.