पैशांची निकड असलेल्या सहकाऱ्याला खासगी पतसंस्थेकडून वैयक्तिक कर्ज मिळावे म्हणून साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली. पण काही महिन्यांतच सहकाऱ्याचे निधन झाले. त्याच्या जागी त्याच्या पत्नीला पालिकेच्या सेवेत नोकरी मिळाली. सर्व हिशेबही त्याच्या कुटुंबाला मिळाला. पण पतसंस्थेच्या कर्जाची परतफेड साक्षीदाराच्या माथी आली. पतसंस्था, तसेच पालिका अधिकाऱ्यांना अर्ज, विनवण्या करून झाल्या. पण दर महिन्याला पगारातून सहकाऱ्याच्या कर्जाचे हप्ते कापून जात आहेत. आधीच आपल्या गृहकर्जाखाली दबलेला हा कर्मचारी आता सहकाऱ्याच्या कर्जाच्या हप्त्यामुळे मेताकुटीस आला आहे. घरखर्च भागविणेही त्याला अशक्य बनले आहे.. अशीच कर्जवसुलीची कुऱ्हाड पालिकेच्या सेवेतील आणखी काही कामगारांवर कोसळली आहे. निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या हिशेबातून अथवा त्याच्या नातेवाईकाला नोकरी मिळाल्यास त्याच्या वेतनातून कर्जाचे हप्ते कापणे गरजेचे आहे. पण तसे न करता साक्षीदारांना वेठीस धरण्यात येत आहे. यामुळे खासगी पतसंस्था आणि पालिका अधिकारी यांच्यात साटेलोटे असावे, अशी शंकेची पाल कामगारांच्या मनात चुकचुकू लागली आहे.
पालिकेच्या जल अभियंता खात्यातील गळती अन्वेषण विभागातील कामगार राजेश वीरकर यांनी आपल्या घरासाठी कर्ज घेण्यासाठी एका साक्षीदाराची आवश्यकता होती. याच विभागातील कामगार सुरेश ढगे साक्षीदार राहिल्याने राजेश वीरकर यांना कर्ज मिळाले आणि कल्याण येथील आपल्या हक्काच्या घरात ते राहावयास गेले. कालांतराने पैशांची निकड भासल्याने सुरेश ढगे यांनी नायगाव, दादर येथील ज्ञानदीप को-ऑप. सोसायटीतून एक लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. कर्जाच्या अर्जावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करण्याची विनंती सुरेश ढगे यांनी राजेश वीरकर यांना केली. मदतीच्या ओझ्यामुळे राजेश वीरकर यांनी त्यांना साक्षीदार म्हणून स्वाक्षरी दिली. मात्र काही महिन्यांतच सुरेश ढगे यांचे निधन झाले. ढगे कुटुंबावर आभाळ कोसळले. मात्र पालिकेने ढगे यांची पत्नी विद्या यांना नोकरी आणि वारसाहक्काप्रमाणे देय रक्कम दिली आणि कुटुंबाचा गाडा पुढे सरकू लागला.
सुरेश ढगे यांचे निधन झाल्याने पतसंस्थेने त्यांच्या कर्जाचे हप्ते साक्षीदार राजेश वीरकर यांच्याकडून जानेवारी २०१५ पासून वसूल करण्यास सुरुवात केली. अचानक वेतनातून पैसे कापल्यामुळे वीरकरही अचंबित झाले. त्यांनी पालिकेत चौकशी केल्यानंतर त्यांना सर्व प्रकार समजला. तात्काळ त्यांनी पतसंस्था, पालिकेचा आस्थापना, विधी आणि लेखा विभागाशी संपर्क साधला. परंतु वेतनातून कर्जाचे हफ्ते कापणे थांबलेले नाही. ढगे यांचे निधन झाल्यावर त्यांच्या हिशेबातून अथवा त्यांच्या पत्नीला पालिका सेवेत नोकरी मिळाल्यानंतर त्यांच्या वेतनातून कर्जाचे हप्ते कापायला हवे होते. पण तसे न करता साक्षीदार म्हणून आपल्याला वेठीस धरण्यात आले आहे. असेच प्रकार अन्य काही कामगारांच्या बाबतीत घडले आहेत. परंतु अशिक्षित कामगार आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे येत नाहीत, अशी खंत वीरकर यांनी व्यक्त केली.
 पतसंस्था अथवा पालिका अधिकारी आपले म्हणणे ऐकत नसल्याने या कामगाराने आता थेट पालिका आयुक्त सीताराम कुंटे, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आदींना पत्र पाठविले आहे. मात्र निराशेविना त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. आता न्याय कुठे मागायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
प्रसाद रावकर, मुंबई