ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे हे गुन्हे न्यायालयात सिद्ध करताना पोलीस अपयशी ठरू लागले आहेत. त्यामुळे दाखल गुन्ह्य़ांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटू लागल्याने खडबडून जाग आलेल्या ठाणे पोलिसांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वानाच प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्याची नोंद कशी करावी, गुन्ह्य़ाचा तपास करताना पुरावे कसे गोळा करावेत आणि आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयासमोर गुन्ह्य़ाचे परिपूर्ण आरोपपत्र कसे सादर करायचे, असे मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरात वेगवेगळ्या तज्ज्ञांमार्फत देण्यात येत आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि वागळे अशी पाच परिमंडळे येत असून त्या अंतर्गत सुमारे ३३ पोलीस ठाणे आहेत. याशिवाय गुन्हे अन्वेषण शाखा, खंडणीविरोधी पथक, अमलीविरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखा, महिला तक्रार निवारण कक्ष आणि अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग, अशा स्वतंत्र शाखा कार्यरत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडय़ाचा प्रयत्न, हाणामारी, घरफोडी, वाहन चोरी, अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्य़ांची नोंद वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दररोज होत असते. तसेच सोनसाखळी चोरी, तोतयागिरी, फसवणूक अशा गुन्ह्य़ांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे. यापैकी कोणत्या गुन्ह्य़ांचा तपास कोणी करावा याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांपासून हवालदारापर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार, गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहून तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक ते हवालदार यांच्याकडे देण्यात येतात. एखाद्या गुन्ह्य़ाचा तपास सोपविल्यानंतर त्याचा स्वतंत्रपणे तपास करण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ाचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत असले तरी न्यायालयामध्ये गुन्हे सिद्घ करताना संबंधित तपास अधिकारी त्रुटी ठेवतात. यामुळे आरोपी पुराव्याअभावी न्यायालयात दोषमुक्त होतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण घटू लागले असून सध्या ठाणे आयुक्तलयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अवघे १० ते ११ टक्के इतके आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांची नोंद करताना अनेक त्रुटी असतात. तसेच तपासात पुरेसे पुरावे गोळा होत नसल्याने आरोप सिद्ध होत नाहीत. फिर्यादी किंवा साक्षीदार फितुर झाल्यामुळेच अनेकदा पोलिसांची फसगत होते. अशा त्रुटींमुळे आरोपी दोषमुक्त सुटतात. प्रभावी तपासाअभावी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामुळे सरकारी वकिलांची बाजू न्यायालयात लंगडी पडते. यामुळेही आरोपी दोषमुक्त सुटतात. यामुळे न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण घटू लागल्याने ठाणे पोलिसांनी आता न्यायालयात परिपूर्ण आरोपपत्र कसे दाखल करता येईल यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिराच्या माध्यामातून एखाद्या गुन्ह्य़ाची नोंद कशा पद्धतीने करावी, गुन्ह्य़ाचा तपास करताना पुरावे कसे गोळा करायचे आणि आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयासमोर गुन्ह्य़ाचे परिपूर्ण आरोपपत्र कसे सादर करायचे, याविषयी शिबिरातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तब्बल दीड महिने चालणाऱ्या एका शिबिरामध्ये सुमारे ४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून त्यांना मोठमोठय़ा गुन्ह्य़ांचा तपास करून न्यायालयात आरोपींना शिक्षा करण्यात यशस्वी ठरलेले पोलीस अधिकारी, कायदेतज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करीत आहेत. याशिवाय, सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू लागल्याने या गुन्ह्य़ांचे पुरावे कसे गोळा करायचे, याविषयीही सायबरतज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत, अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी दिली.