गुजराती भाषक मतदार नरेंद्र मोदी यांच्या ‘भारतीय जनता पक्षा’ला एकगठ्ठा मतदान करीत असल्याचे महाराष्ट्रातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रकर्षांने दिसून आले होते. म्हणूनच या समाजाच्या एकगठ्ठा मतांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत उतरलेले प्रमुख राजकीय पक्ष करीत आहेत. त्यासाठी गुजराती भाषक वक्त्यांची शोधाशोध करण्यापासून ते कामाचे अहवाल, जाहिरातीचे फलक, माहितीपत्रके गुजराती भाषेत छापण्यापर्यंतचे अनेक मार्ग अवलंबले जात आहेत.
विरार-वसईच्या ११५ प्रभागांकरिता १४ जूनला मतदान होणार आहे. त्यामुळे येथील प्रचार टिपेला पोहोचला आहे. पूर्वीपासूनच वसई-विरारमध्ये मराठी भाषकांची संख्या जास्त आहे. परंतु, स्थलांतरितांची संख्या वाढल्याने मुंबईला लागून असलेल्या या महानगरपालिकेचे स्वरूपही आता कॉस्मोपॉलिटीन होऊ लागले आहे. गेल्या ३० वर्षांत या परिसरातील लोकसंख्या २ लाखांवरून तब्बल १८ लाखांवर पोहोचली आहे. एकटय़ा नालासोपाऱ्याची लोकसंख्याच २००१ ते २०११ या दरम्यान सुमारे २३८ टक्क्य़ांनी वाढली आहे. हा एक प्रकारचा जागतिक विक्रम आहे. २०१० साली या महानगरपालिकेत ८९ प्रभाग होते. मात्र लोकसंख्या वाढीमुळे ही संख्या ११५ वर गेली आहे. लोकसंख्या इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढूनही या भागात अजूनही मराठी भाषकांचे प्राबल्य आहे. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६० टक्के लोक हे मराठी भाषक आहेत. मात्र उर्वरित ४० टक्क्य़ांमध्ये गुजराती भाषकांची संख्या लक्षणीय आहे. त्या खालोखाल हिंदी, दाक्षिणात्य भाषक इथे राहतात. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत गुजराती भाषकांनी मोदींसाठी भाजपला एकगठ्ठा मतदान केल्यामुळ या मतदारांमध्ये निवडणुकीची गणिते बदलण्याची क्षमता असल्याचे येथील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लक्षात आले आहे.
म्हणूनच वसई गावातून निवडणूक लढणाऱ्या एका उमेदवाराने आपला अहवाल मराठी, हिंदी बरोबरच गुजराथीतही प्रकाशित केला आहे. नालासोपाऱ्यातील एका सभेसाठी व्यवसायाने वकील असलेल्या एका गुजराती नेत्याला खास भाषण करण्याकरिता आणावे लागले. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनीही आपले फलक मराठीबरोबरच गुजराथीतून झळकविले आहेत हे विशेष. इतकेच काय तर माहितीपत्रके, बिल्ले, कामाचे अहवाल देखील गुजरातीतून छापले जात आहे.