ज्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: हाती झाडू घेऊन साऱ्या नोकरशाहीलाही झाडू हाती घ्यायला लावत आहे, त्या जनतेला, नागरिकांना थोडेतरी शहाणपण आहे काय, अशी परिस्थिती नजर टाकावी तेथे दिसते. रेल्वे स्थानकाची संरक्षण भिंतीवर पान व खर्राची लाळ थुंकून तिचा रंगच बदलेला दिसतो. भिंतीजवळ गुटखाची वेस्टने, प्लास्टिकच्या पन्न्या, सिगारेटची रिकामे पाकिटे आदींचा कचरा पडलेला दिसतो. फलाटाकडे जाताना वऱ्हांडय़ातही कागदाचे चिटोरे पडलेले दिसतात. रुळांची स्वच्छता होत असली तरी काहीवेळाने तेथे रिकाम्या बाटल्या, खाद्य पदार्थाची वेस्टने, गुटख्याची रिकामी वेस्टने, कागद आदींचा कचरा पडलेला दिसतो.
दोन्ही दिशांकडील पार्किंगच्या आवारात हा कचरा विखुरलेला दिसतो. कुठेही थुंकणे, हा जणूकाही जन्मसिद्ध अधिकार असल्याचे लोक वागतात. रस्त्या, पदपथ, संरक्षण भिंती, शासकीय वा खासगी कार्यालयाच्या इमारती, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बस, रेल्वे कुठेही नजर टाका, पान आणि खर्रा खाल्ल्यानंतरची लाळ थुंकलेली दिसते. त्यातील काथाने संबंधित जागा रंगलेल्या असतात.
मानस चौकाजवळील लोखंडी पुलाशेजारची रेल्वेची भिंत व पदपथही लोकांनी सोडलेला नाही. मूत्रविसर्जन करणाऱ्यांची रांग तेथे नेहमीच दिसते. तेथून जाणाऱ्या प्रत्येकाचा हात नाकावर जातोच, इतका तेथे दरुगध असतो. आरोग्य कर्मचारी चुना टाकत असले तरी काही मिनिटांनंतर पुन्हा दरुगध पसरतो. पुलाच्या दुसऱ्या बाजूला मुतारी आहे.
 तेथपर्यंत जाण्याच्या फंदात कुणी पडत नाही. मुतारी दोन-तीन दिवसांपूर्वीच नव्याने बांधली असली तरी तेथे केव्हा दरुगध असतो. व्हरायटी चौकाजवळील महाराजबागेचा कोपरा, काचीपुरा चौक यासह अनेक ठिकाणी अशा जागा आहेत.
महालमधील बुधवार भाजी बाजारात सकाळनंतर केव्हाही गेले ती भाजीचा कचरा पडलेला दिसतो. भाजी घ्यायला येणाऱ्या नागरिकांना त्या कचऱ्यातूनच पायपीट करावी लागते. या बाजारामागील गल्लीतही सकाळनंतर भाजी व इतर कचरा पडलेला असतो. महात्मा फुले भाजी बाजार, गोकुळपेठ भाजी बाजारात अनेक ठिकाणी भाजीचा कचरा दिसतो. राजविलास टॉकीजच्या मागील भागापासून या संपूर्ण गल्लीत लोक मूत्रविसर्जन करीत असल्याने तेथेही दरुगध कायम असतो. सकाळी स्वच्छता केली जात असली तरी दिवसभर येथे घाण व दरुगध असतो. मागील तीस वर्षांपासून कायम असलेल्या या परिस्थितीमुळे या गल्लीला ‘अत्तर गल्ली’ असे नाव पडले आहे.  
रोज रस्ताच काय अगदी गल्लीही झाडली जाते. कचरा नेण्यासाठी गाडी दारावर येते. रस्त्यांवर पावलोपावली महापालिकेने कचरा कुंडय़ा ठेवल्या आहेत. तरीही जागा दिसेल तेथे कचरा टाकला जातो. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या पश्चिम व दक्षिण संरक्षण भिंतीबाहेर रोजच कचऱ्याचा ढीग दिसतो.