राज्य सरकारने गुटखा व पानमसाल्यावर बंदी आणल्यानंतर अन्न व औषध विभागाने गेल्या नऊ महिन्यात पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्य़ांत जवळपास दोन हजार गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. तर राज्यात विविध भागात कारवाई करून २५ कोटी रुपयाचा गुटखा व पानमसाला जप्त केल्याची माहिती मिळाली. नागपूर विभागात सर्वाधिक ५३४ तर सर्वात कमी वर्धा जिल्ह्य़ात १५७ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
तंबाखू आणि गुटखाबंदी संदर्भात राज्य सरकारने धोरण निश्चित केल्यानंतर राज्यात वैद्यकीय संघटनांसह शैक्षणिक आणि सामाजिक संघटनांनी मोठय़ा प्रमाणात गुटखा बंदीची मोहीम राबविली. विदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागाने गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून मोठय़ा प्रमाणात जप्त केला. गेल्या दीड वर्षांत बंदी आणल्यानंतर गुटख्यांची खुलेआम विक्री सुरू असताना अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई सुरू केली. रेल्वे व सीमावर्ती भागातून गुटखा महाराष्ट्रात येत आहे. बंदीची तीव्रता वाढविण्यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे.
गेल्या नऊ महिन्यात १ हजार ९८० विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात नागपूरमध्ये ५३४ विक्रेत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडमून ८५ लाख ४३ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला, भंडारामध्ये ४५७ विक्रेत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १२ हजार ६६, चंद्रपूरमध्ये ३३८ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २० लाख २८ हजार ३८० रुपयांचा, गडचिरोलीमध्ये ४९४ विक्रेत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लाख १४ हजार ४५, वर्धामध्ये १५७ विक्रेत्यांवर कारवाई केली असून १ लाख ८५ हजार ६१५ रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यामध्ये नागपुरात ३१ , भंडारा ५, चंद्रपूर ५, गडचिरोली २ व वर्धा २ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात ६५ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात नागपुरात २८, भंडारा ५, चंद्रपूर ६, गडचिरोली २ आणि वर्धा २ विक्रेत्यांचा समावेश आहे.  
 राज्य सरकारने २०१२ -१३ मध्ये गुटख्यावर बंदी आणली. गुटख्यामुळे फुफ्फुसाच्या आणि घशाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. १५ ते २५ वयोगटातील युवकांमध्ये गुटखा सेवन मोठय़ा प्रमाण वाढले आहे.
दंत महाविद्यालयांसह अनेक सामाजिक संघटना प्रयत्न करीत असले तरी गुटखा सेवनाचे प्रमाण कमी होत नाही.  शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गुटखा सेवनाचे प्रमाण अधिक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.