व्याख्याते व प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि दुर्गेश परुळकर लिखित ‘ज्ञान-अज्ञात सावरकर’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या २० एप्रिल रोजी लंडन येथे होणार आहे. हे पुस्तक गार्गीज् प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
लंडन येथील हिथ्रो येथे होणाऱ्या तिसऱ्या सावरकर विश्व संमेलनात या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेतील ज्येष्ठ सावरकरप्रेमी-अभ्यासक श्रीधर दामले यांच्या हस्ते होणार आहे. लंडन येथे राहणारे इतिहास संशोधक वासुदेव गोडबोले या वेळी उपस्थित राहणार आहेत.  स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे कार्य अद्यापही अज्ञात आहे. ‘अभिनव भारत’, सावरकर यांचे लंडन येथील कार्य, आझाद हिंदू फौज आदींमध्ये सावरकर यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. या आणि अशा काही बाबींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला           आहे. या संमेलनात डॉ. शेवडे यांचे ‘सावरकर- एक झंजावात’ या विषयावर व्याख्यानही होणार आहे, तर अभिनेते शरद पोंक्षे हे ‘सावरकर दर्शन’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. सावरकर सेवा संस्था आणि लंडन येथील बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.