ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील खर्डीसह आसपासच्या परिसरात सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला असून त्यामध्ये कळमगाव परिसरातील बेबी मिनाज खलिफा ही दोन वर्षीय बालिका जखमी झाली आहे. शहापूर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या वादळी वाऱ्याने भाजीपाला भुईसपाट झाला आहे.  शहापूर तालुक्यातील खर्डी, कळमगाव, दळखण यांसह आसपासच्या पाडय़ांमध्ये सोमवारी सायंकाळी ५.३०च्या सुमारास जोरदार गारांचा पाऊस झाला असून त्यामध्ये काही घरांचे पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. सुमारे अर्धा तास हा पाऊस पडत होता. त्यामुळे या भागातील रहिवाशांची तारांबळ उडाली. या घटनेत जखमी झालेली बेबी घरात झोपलेली असताना गारांमुळे पत्रा तुटून तिच्या अंगावर पडला. त्यात ती जखमी झाली. तर रविवारी जोरदार गारपिटीचा तडाखा या भागांना सहन करावा लागला होता. डोळखांब, किन्हवली, सावरोली, भातसा या भागांतील सुमारे ५०० हून अधिक घरे आणि गोठय़ांना नुकसान सहन करावे लागले आहे. घरांवरील कौले, पत्रे उडून गेले. तर साडेचार हजार हेक्टर जमिनीवरील भाजीपाला भुईसपाट झाला. भेंडी, दुधी, कारली आदी भाजीपाला या पावसात भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. निवडणूक कामात तलाठी आणि महसूल कर्मचारी असल्याने पंचनामे करण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पोल्ट्री आणि लघुउद्योगांना याचा फटका बसला आहे.