नवी मुंबईतील दिघा परिसरात दोन कोटी साठ लाख रुपये खर्चून साने गुरुजी बाल उद्यान बांधण्याचे काम सुरू आहे. या कामास नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागूनही काम पूर्ण झालेले नाही, असे असतानाही निवडणुकीच्या तोंडावर या उद्यानाचे उद्घाटन रविवारी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करून भ्रष्टाचाऱ्यांची एक प्रकारे पाठराखण केली आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या दिघा परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साने गुरुजी बाल उद्यान साकारण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी उद्यानाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र नियोजित एक वर्षांच्या कालावधीत या उद्यानाचे काम पूर्ण झालेले नाही. निविदा प्रक्रियेच्या लांबणीनंतर दोन कोटी साठ लाख रुपये खर्चून या उद्यानाचे काम करण्यास मंजुरी देण्यात आली. ऐरोली मतदारसंघात साकारणारा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम पालिका आणि ठेकेदाराच्या आडमुठी धोरणामुळे रखडला होता. या ठिकाणी असणारे सुलभ शौचालय हटवून नागरिकांना प्रशस्त उद्यान उपलब्ध करून देण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिले होते. मात्र पालिकेच्या अभियंत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. आज दोन वर्षे झाले तरी या उद्यानाचे काम अद्याप सुरू आहे. या उद्यानासाठी महासभेत अनेकदा गदारोळही झाला होता, असे भाजपने म्हटले आहे.

जुन्या भिंतींना मुलामा
साने गुरुजी बाल उद्यानात जुन्याच भिंतींना मुलामा चढवण्यात आला आहे. सुलभ शौचालय आदेश देऊनही हटवण्यात आलेले नाही. तर प्रस्तावित असणारी विविध चित्रशिल्पे अधिकाऱ्यांनी परस्पर रद्द केली आहेत. महानगरपालिकेच्या या उद्यानाची निर्मिती करताना या ठिकाणी लहान मुलांसाठी मिनि ट्रेन, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी चित्रशिल्प, जिंगल व पक्ष्यांचे आवाज असणारे म्युझिक, साने गुरुजींचे तलचित्र त्याचबरोबर सुंदर सजावटीतील प्रवेशद्वार अशी एकंदरीत या उद्यानाची रचना होती. मात्र प्रत्यक्षात या उद्यानात असणाऱ्या जुन्या भिंतींना केवळ मुलामा चढवण्यात आला आहे. बालउद्यानाचे एका बाजूचे प्रवेशद्वारदेखील जुनेच ठेवण्यात आले आहे. तर मिनी ट्रेनचा मार्गदेखील छोटा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अभियंता संजय देसाई यांनी या ठिकाणी पाहणी केली होती. त्यांनतर या पाहणीत नजीकच्या तलावातील शिल्पचित्र परस्पर रद्द करण्यात आल्याचे या वेळी निदर्शनास आले, असे भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. विशाल मोहिते यांनी म्हटले आहे. आयुक्तांनी या बाल उद्यानाची चौकशी करावी अशी मागणीदेखील केली आहे.

विरोधकांना आंदोलन करण्याशिवाय दुसरे काही येत नाही. नागरिकांसाठी असणाऱ्या लोकाभिमुख प्रकल्पात अडचणी निर्माण करणे हे विरोधकांचे काम आहे. साने गुरुजी बाल उद्यानात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही.
संदीप नाईक, आमदार

नवी मुंबई शहरासाठी भूषणावह असणाऱ्या साने गुरुजी बाल उद्यानात मोठय़ा प्रमाणात भष्टाचार झाला आहे. या प्रकरणी भाजपने आंदोलन केले होते. पण सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आम्हाला नोटीस पाठवण्यास सांगून उद्यानाचे उद्घाटन करून घेतले. उद्यानामध्ये असणारे विविध प्रकल्प परस्पर रद्द करण्यात आले आहेत. उद्यानामध्ये मुलांसाठी साधे शौचालय देखील बाधण्यात आलेले नाही. नव्या आयुक्तांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून या उद्यान प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आमची मागणी आहे.
अ‍ॅड. विशाल मोहिते, जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी</p>