पहिल्या दिवसापासून मुंबईकरांसाठी केवळ ‘जॉय राइड’ ठरलेल्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असून सध्या हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकाजवळील कामाने वेग घेतला आहे. मात्र मोनोरेलच्या या वेगवान कामामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र कमालीची धिमी झाली आहे. हार्बर मार्गावरील रेल्वेरुळांवर गर्डर टाकून तेथून मोनोरेलचा मार्ग नेण्याच्या कामामुळे सध्या हार्बर मार्गावर ताशी ३० किलोमीटर अशी वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यामुळे वडाळा स्थानकाजवळ गाडय़ांचा वेग अतिशय कमी होत असल्याने हार्बर मार्गाचे वेळापत्रक कोलमडत आहे. परिणामी हार्बर मार्गावरील लाखो प्रवाशांना दर दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही वेगमर्यादा ३१ जुलपर्यंत लागू असून त्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
चेंबूर ते वडाळा डेपो या मोनोरेलच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात फेब्रुवारी २०१४मध्ये झाली होती. भारतातील पहिल्यावहिल्या मोनोरेलला पहिल्याच महिन्यात प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. मात्र नव्याची नवलाई ओसरल्यानंतर दर दिवशी मोनोरेल वापरणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. अनेकदा पांढरा हत्ती पोसत असल्याची टीकाही राज्य सरकारवर झाली. मात्र वडाळा डेपो ते जेकब सर्कल (महालक्ष्मी स्थानकाजवळ) हा मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू झाला की, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल, असे एमएमआरडीएतर्फे वारंवार सांगण्यात येत होते.
या दुसऱ्या टप्प्यासाठीही अनेक अडचणी असून वडाळा स्थानकाजवळ मोनोरेलचा मार्ग रेल्वेमार्ग ओलांडतो. येथे मोनोरेलचा पूल बांधण्यासाठी रेल्वेमार्गाजवळ गर्डर टाकण्याचे काम हाती घ्यायचे होते. त्यासाठी रेल्वेची परवानगी अपेक्षित होती. रेल्वेने परवानगी दिली असली, तरी हे काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षेचा उपाय म्हणून हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा     वडाळा स्थानकाजवळील या पट्टय़ात ताशी ३० किमी वेगानेच धावतील, अशी सूचना रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे. या सूचनेमुळे सध्या हार्बर मार्गावरून वाशी, पनवेल, अंधेरी अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा वडाळा स्थानकाजवळील या पट्टय़ात फक्त ३० किमी किंवा त्याहीपेक्षा कमी वेगाने जात आहेत. वेगमर्यादा नसते, त्या वेळी या पट्टय़ातून जाणाऱ्या गाडय़ांचा वेग ६० ते ७५ किमी एवढा असतो. सध्या हा वेग निम्म्याहून कमी असल्याने अनेक गाडय़ांच्या वेळापत्रकात तीन ते चार मिनिटांचा फरक पडत आहे. तसेच एक गाडी रखडल्यावर त्यामागची गाडीही रखडत असल्याने त्याचा परिणामही वेळापत्रकावर होतो, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले. ही वेगमर्यादा ३१ जुलपर्यंत लागू असल्याने आणखी महिनाभर प्रवाशांची गरसोय होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.