मुंबई विद्यापीठाच्या सावळागोंधळ कारभाराचा अस्सल नमुना कोणता द्यायचा ठरला तर तो यश देशपांडे या ‘तृतीय वर्ष वाणिज्य शाखे’च्या (टीवायबीकॉम) विद्यार्थ्यांला गेल्या पाच वर्षांत आलेल्या अनुभवाचा द्यावा लागेल. कारण हा विद्यार्थी गेली पाच वर्षे आपल्या गुणपत्रिकेसाठी विद्यापीठात वणवण करीत आहे. आतापर्यंत या विद्यार्थ्यांने आपली गुणपत्रिका मिळविण्याकरिता विद्यापीठाच्या पायऱ्या किमान १०० वेळा तरी झिजवल्या असाव्यात.
या विद्यार्थ्यांच्या वणवणीला सुरुवात झाली ती जेव्हा त्याने दादरच्या कीर्ती महाविद्यालयातून प्रवेश काढून विद्यापीठाच्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’त (आयडॉल) टीवायबीकॉमला प्रवेश घेतला तेव्हा. ते वर्ष होते २०१०. महाविद्यालयातून दिला जाणारा एकमेव पर्याय म्हणजे ‘अकाऊंट्स’ हा विषय त्यावेळी त्याला कठीण जात होता. त्याला पर्याय म्हणून ‘बिझनेस मॅनेजमेंट’ हा विषय आयडॉलमधून घेता येत होता. म्हणून त्याने कीर्तीमधून प्रवेश काढून आयडॉलला प्रवेश घेतला. त्याच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले ते तेव्हापासून.
त्यावेळी यशला ‘द्वितीय वर्ष वाणिज्य शाखे’मध्ये (एसवायबीकॉम) एका विषयाला एटीकेटी होती. यशने एप्रिल २०१० मध्ये टीवायबीकॉमची परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्णही झाला. मात्र पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांत एटीकेटी असल्यास तृतीय म्हणजे अंतिम (टीवायबीकॉम) परीक्षेचा निकाल मिळत नाही.
परिणामी २०११ मध्ये त्याने तो एटीकेटी लागलेला विषयही सोडविला. म्हणजे त्यात तो उत्तीर्ण झाला. नियमाप्रमाणे त्याने विद्यापीठाला ‘आता आपल्याला प्रथम व द्वितीय वर्षांत एकही एटीकेटी नाही,’ असे लिहूनही दिले. त्यानंतर त्याला त्याचा निकाल मिळायला हवा होता. परंतु तेव्हापासून कधी २० दिवसांनी ये तर कधी महिनाभराने ये, असे यशला सांगण्यात येत आहे आणि यश त्याप्रमाणे विद्यापीठाच्या खेपा घालत आहे.
विद्यापीठाच्या नियमानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत गुणपत्रिका मिळाली नाही तर नक्कल प्रत द्यावी, असा नियम आहे. परंतु ७६००६ असा आसनक्रमांक असलेल्या यशची गुणपत्रिका आयडॉलकडे नाही. किंबहुना आपल्या ‘रेकॉर्ड’मध्ये ती सापडत नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. पण २०१० साली विद्यापीठाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची त्यांच्या आसनक्रमांक आणि परीक्षा केंद्रानुसार जी यादी केली होती त्यात यशचा उल्लेख आहे, असे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आणि मनविसेचे कार्यकर्ते सुधाकर तांबोळी यांनी सांगितले.
यश आपली व्यथा तांबोळी यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी आता या प्रकरणाचा विद्यापीठाकडे पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. किमान अधिसभा सदस्याला तरी याकरिता वणवण करावी लागणार नाही, अशी अपेक्षा आहे.