खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले मनसेचे दहिसर येथील पदाधिकारी शैलेश उतेकर यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणात त्यांचा कुठलाही सहभाग आढळून न आल्याने पोलिसांनी त्यांना दोषमुक्त करण्याचा अर्ज दिला होता. मात्र या प्रकरणात उतेकर यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.
मुंबईतल्या एका वास्तुविशारदाला मलेशियातून एका कथित भाईकडून १५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दूरध्वनी येत होते. ही खंडणी नाही दिली तर जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. यानंतर मुंबईतल्या स्थानिक सार्वजनिक दूरध्वनी केंद्रातून (पीसीओ) या गुंडाची माणसे फोन करत होती. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने १० जून रोजी या प्रकरणी तपास करून विनोद राजपेठे याला अटक केली. विनोद राजपेठेने या प्रकरणामागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे दहिसर येथील स्थानिक नेते शैलेश उतेकर यांचे नाव घेतले. उतेकर यांच्या सांगण्यावरूनच अशी धमकी दिल्याची माहिती त्याने दिली. त्याच्या या जबानीवरून पोलिसांनी उतेकर यांना अटक केली. या प्रकरणात आपला काही संबंध नाही, मी आरोपी फिर्यादींना ओळखत नाही असे उतेकर पोलिसांना सांगत होते. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ आरोपींना अटक केली होती.
दरम्यान, पोलिसांनी सखोल तपास केला असता शैलेश उतेकर यांचा कुठलाही सहभाग आढळून आला नाही. उतेकर आरोपीला ओळखत नव्हते, त्यांच्या मोबाइलमधल्या कॉल्सचे डिटेल्स, टॉवर लोकेशन तपासले असता काहीच आढळून आले नाही. त्यांच्या या खंडणी प्रकरणाशी तसेच अंडरवर्ल्ड अथवा कुठल्याही गुंडाशी संबंध असल्याचेही आढळून आले नाहीत. त्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज करून उतेकर यांना दोषमुक्त करण्याची विनंती केली. उतेकर यांचा या प्रकरणात काहीच संबंध नसल्याने आम्ही हा अर्ज न्यायालयाला सादर केल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन कदम यांनी सांगितले. त्या अर्जानंतर या गुन्’ाात कुठलाही संबंध नसल्याने किल्ला न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी उतेकर यांना फौजदारी दंडसंहिता कलम १६९ अन्वये या प्रकरणी दोषमुक्त केले.
या प्रकरणातील अटक आरोपी गोपाळ शेट्टी याचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. तसेच एका प्रकरणात अटक झाली होती.
हे सर्व घडविण्यात उतेकर कारणीभूत असल्याचा शेट्टी याचा समज होता. त्यामुळेच शेट्टी याने राजपेठे याला आमिष दाखवून उतेकर यांचे नाव घेण्यास भाग पाडले होते, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात मला पाच दिवस पोलीस कोठडीत काढावे लागले आणि नाहक त्रास झाला असे उतेकर म्हणाले. पोलिसांनी कुठल्याही निरपराध आणि सामान्य माणसला अटक करण्यापूर्वी खातरजमा करायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.