डोंबिवलीतील देसलेपाडा येथील नवनीतनगर येथे सोमवारी रात्री अल्पवयीन तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीत संतोष विच्छीवरा या १९ वर्षांच्या तरुणाला जीव गमवावा लागला. संतोषच्या जाण्याने विच्छीवरा कुटुंबाचा कमावता आधाराच गेला आहे. अलीकडेच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. पुढे करायचे काय असा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला आहे.
संतोषचे वडील गेल्या वर्षीच वारले. आई विमला कर्करोगाने आजारी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. औषधांच्या खर्चाचा भार आहे. बहिण तन्वीर आणि भाऊ कार्तिक शालेय शिक्षण घेत आहेत. एका मार्बल कंपनीत काम करणारा संतोष महिन्याकाठी मिळणाऱ्या सहा हजाराच्या पगारावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता. संतोषच्या जाण्याने घरातील ही सर्व व्यवस्थाच कोलमडून पडली आहे.
नवनीत नगर परिसरात जैन समाजाची वस्ती मोठी आहे. विच्छीवरा कुटुंबही अशाच जैन समाजापैकीच. कुटुंबाची परिस्थिती सामान्य असल्याने समाजातील जुन्या-जाणत्यांनी पुढाकार घेऊन या कुटुंबाला नवनीतनगर येथे अल्प किंमतीत घर उपलब्ध करून दिले. मात्र, गेल्या वर्षी संतोषच्या वडिलांचे देहावसान झाले. पाठोपाठ आईला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. तेव्हापासून एका मार्बल कंपनीत काम करून संतोषने कुटुबांचा गाडा आपल्या खांद्यावर घेतला. आता हा आधारही गेल्याने वच्छिवारा कुटुबांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संतोषची हत्या करणारी पाचही अल्पवयीन मुले १६ ते १८ वयोगटातील असून, त्यांना भिवंडीच्या सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्यातील एक तर आठवीत शिकतो आहे. एक तरूण वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे.